शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

राज्यातील विद्यापीठं शैक्षणिक पर्यटन केंद्र व्हावीत: उदय सामंत

Thursday, 4th February 2021 06:30:34 AM

गडचिरोली,ता.४: देश, विदेशातील पर्यटकांनी महाराष्ट्रात येऊन येथील समृद्ध शैक्षणिक वारसा आपल्या मनी साठवावा, यादृष्टीने विद्यापीठांना शैक्षणिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यास राज्य शासन प्रयत्नशिल असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.

आज उदय सामंत यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाच्या डाटा सेंटरचे लोकार्पण, मॉडेल कॉलेजचे भूमिपूजन आणि शासकीय विज्ञान महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले, त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री.सामंत पुढे म्हणाले, मुंबई विद्यापीठाचा इतिहास वैभवशाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महापुरुषांनी तेथे शिक्षण घेतलं. त्यांची महती सर्वांना कळावी,तसेच इतरही बाबींची माहिती व्हावी, यासाठी मुंबई विद्यापीठ पर्यटकांसाठी खुले करण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासह इतर विद्यापीठांनीही स्वत:ला विकसित करावे, अशी अपेक्षा असून, त्यासाठी राज्य शासन अर्थसाहाय्य करण्यास कुठलीही कसूर करणार नाही, अशी ग्वाही श्री.सामंत यांनी दिली.

गोंडवाना विद्यापीठात पहिल्या टप्यात ५० एकर जागेत तातडीने अद्यावत शैक्षिणिक सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत. यातून अगदी इतर विद्यापीठेही या होणाऱ्या नवीन सुविधा पाहण्यास येतील, अशी आशा आहे. विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष व प्रशासन यांनी सांघिक भावनेतून काम केल्यास शैक्षणिक क्षेत्रात आपले राज्य देशात नंबर एकवर असेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यासाठी शिक्षण प्रक्रियेत राजकारण न आणता एकत्र येऊन युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणे तुम्हा आम्हा सर्वांचे लक्ष असले पाहिजे. राज्यातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन परीक्षा दिल्या. परंतु एकालाही कोरोना बाधा झाली नाही. तसेच उर्वरीत ९७ टक्के विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या. या सर्व परीक्षा राज्य शासनाने देशात आदर्शवत पार पाडल्या, याबद्दल त्यांनी प्राध्यापक, विद्यार्थी, पोलीस तसेच महसूल विभागाचे कौतूक केले.

आपण तीन महिन्यांत गोंडवाना विद्यापीठाला १२ ‘ब’ चा दर्जा मिळवून देणे, मॉडेल कॉलेजचे हस्तांतरण आणि डाटा सेंटरची निर्मिती या प्रश्नांची सोडवणूक केली. आगामी तीन महिन्यांत गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी व वन विद्यापीठाचा विशेष दर्जा देण्याचे काम करण्याचा संकल्प आहे. या विद्यापीठातील डाटा सेंटरमुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना त्याचा लाभ होईल. तसेच नव्याने सुरु होणार असलेले मॉडेल कॉलेज हे गडचिरोलीची नवी ओळख बनेल, असा विश्वास श्री.सामंत यांनी व्यक्त केला.

शासकीय विज्ञान महाविद्यालयात कला आणि वाणिज्य विभाग सुरू करण्याची व महाविद्यालयाला पाच एकर जागा उपलब्ध करून देऊन तेथे भव्य क्रीडा संकुल उभारण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. आपल्या भाषणात उदय सामंत यांनी स्व.आर. आर. पाटील यांनी गडचिरोलीच्या विकासात दिलेल्या योगदानाचे स्मरण केले.

यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.श्रीनिवास वरखेडी, आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, सीईटीचे प्रमुख चिंतामण जोशी, उच्चशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक अभय वाघ, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.अनिल चिताडे यांच्यासह विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DK9H7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना