/* */
शनिवार, 30 सप्टेंबर 2023
लक्षवेधी :
  गडचिरोली:सिझेरियन प्रसूती झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ             लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या घडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार, १ जखमी-चामोर्शी येथील घटना             ३३ टक्के आरक्षण देऊन पंतप्रधानांनी महिलांचा सन्मान केला: खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन           

मोहगावात सुरु झाली गोंडी भाषेतून शिक्षण देणारी पहिली शाळा

Monday, 22nd February 2021 06:34:03 AM

गडचिरोली,ता.२२: जागतिक मातृभाषा दिनी धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे गोंडी भाषेतून शिक्षण देणारी पहिली शाळा ग्रामसभेच्या पुढाकाराने सुरु झाली आहे.

मोहगाव हे आदिवासीबहुल गाव असून, ते प्रयोगशिल गाव म्हणून ओळखले जाते. तेथील युवकांनी ग्रामसभांच्या अधिकारासाठी नेहमीच लढा दिला आहे. ‘पेसा’ कायद्यान्वये सामूहिक तेंदू संकलन, बांबू कटाई व अन्य उपक्रमांच्या माध्यमातून युवकांनी गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय गाव गणराज्य शिलालेखाच्या स्थापनेतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. २२ फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन होता. यानिमित्त आदिवासी बोलीभाषा टिकून राहावी, तशीच ती नव्या पिढीला बोलता यावी, यासाठी मोहगावच्या युवकांनी गावात ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध  संस्कार गोटुल’ या नावाने शाळा सुरु केली. संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील २४४(१), ३५० (क) आणि १३ (३) (क)  या कलमांमधील तरतुदीनुसार ग्रामसभेला प्राप्त अधिकारान्वये गोंडी भाषेतून शिक्षण देणारी ही शाळा सुरु करण्यात आली आहे रूक्ता उसेंडी, राजकुमारी कोराम व रीना आतला या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थिनी अंगणवाडीतील १५ विद्यार्थ्यांना या शाळेतून गोंडी भाषा आणि संस्कृतीचे धडे देण्यात येणार आहेत.

गोंडी लिपी अधिक विकसित करून भविष्यातील शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळेच्या माध्यमातून केला जाईल. छत्तीसगड, मध्य प्रदेशात गोंडी बोली भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु त्यांची लिपी ही देवनागरी आहे. देवनागरीला समांतर अशी गोंडी, मुंडारी आणि कोरकु या बोली भाषांची स्वतंत्र  लिपी आहे, ती क्रमबद्ध करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटनझाले.यावेळी समाजसेवक गणेश हलामी,गडचिरोलीच्या माजी नगरसेविका यशोधरा उसेंडी, देवसाय आतला, बावसू पावे उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, वैश्विक समाज जीवनात प्रत्येक भाषेचे स्वतंत्र महत्त्व अधोरेखित झालेले आहे..बोलीभाषा ही त्या- त्या समाजाची किंवा समुहाची परंपरा, रचना, ओळख आणि स्वाभिमान सांगणारे माध्यम आहे. प्रत्येकाला त्याची मातृभाषा हवी आहे. गोंडी भाषा ही परिपूर्ण भाषा आहे.गोंडी भाषेचा विकास होण्यासाठी तिचा संविधानाच्या आठव्या अनुसूचित समावेश झाला पाहिजे. यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज  डॉ उसेंडी यांनी व्यक्त केली. गोंडी भाषेबरोबरच राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रात प्राथमिक व आश्रमशाळांमध्ये गोंडी, कोरकू, भिल्ल या बोलीभाषा शिकवण्याकरिता स्वतंत्र शिक्षक व  तासिका ठेवण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

याप्रसंगी आदिवासी समाजसेवक गणेश हलामी यांनी आदिवासींची भाषा, इतिहास आणि संस्कृतीचे विस्तृत विवेचन केले. आदिवासी साहित्यिक डॉ. मोतीरावण कंगाली यांनी हडप्पा, मोहेंजोदडो येथील ऊत्खननात आढळलेल्या मुद्रांवरील लिपी सर्वप्रथम वाचून दाखवली. त्यामुळे गोंडी लिपीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. गोंडवाना लँड हा भारतीय उपखंडाचा भाग असून, गोंडी भाषा ही पृथ्वीवरची सर्वात पहिली भाषा असावी. शिवाय ती नैसर्गिक भाषा असून सर्व भाषांची जननी आहे. त्यामुळेच गोंडी संस्कृतीचा इतिहास व संशोधनासाठी आता विदेशातूनही लोक येत असल्याचे ते म्हणाले. मध्यप्रदेशात गोंडी, भिल्ल आणि कोरकू या बोली भाषांना मान्यता मिळाली आहे. तशीच मान्यता महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्राथमिक शिक्षण हे बोली भाषेतूनच व्हावे, असे अनेक शिक्षक तज्ज्ञांनी म्हटले आहे. परंतु  देशभरातील आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण त्या- त्या राज्याच्या मातृभाषा किंवा राज्यभाषेतून प्राप्त होते. अशावेळी आदिवासी किंवा गोंड या जमातीच्या विद्यार्थ्यांची कुचंबना होते. आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संदर्भात हे प्रामुख्याने आढळून येते. त्यामुळे गोंडी बोली भाषेतून शिक्षण देणारी शाळा ही आजची गरज आहे. असे मत मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बावसू पावे,संचालन माणिक हिचामी, तर आभारप्रदर्शन काशिनाथ आतला यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी देवसाय आतला, गांडोजी आतला, लालसू आतला, बाबूराव गेडाम, बिरजू आतला, शत्रुघ्न येरमे, अलसु पावे, बावसु पावे, सुरेश गावडे, भूमेश्वर कावळे, दिनेश टेकाम, माणिक हिचामी, बावसु दुगा, उत्तम आतला लालाजी उसेंडी, मसरू तुलावी यांनी सहकार्य केले

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RB68F
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना