शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

दलाल नेत्यांपासून सावध राहा: मराठा समाजाला माओवाद्यांचा सल्ला

Sunday, 13th June 2021 06:48:56 AM

गडचिरोली,ता.१३: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर या समाजात पसरलेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी त्यात उडी घेतली आहे. नक्षल चळवळीचा महाराष्ट्रातील सर्वोच्च नेता तथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष(माओवादी)चा राज्य सचिव सह्याद्री याने प्रसिद्धीपत्रक काढून ‘मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे,’ असा सल्ला दिला आहे.

काळाच्या ओघात जसे अन्य समाजातील जनतेत बदल घडले; तसेच बदल मराठा समाजातही घडले आहेत. मराठा समाज शेतकरी असून, तो स्वत:च्या मेहनतीवर जगणारा समाज आहे. मात्र, आज या समाजाला आरक्षणाकरिता ओरड करावी लागत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची समस्या म्हणजे देशातील कृषी संकटाचेच एक लक्षण असून त्यास सरकारी धोरण जबाबदार आहे, अशी टीका माओवादी नेता सह्याद्री याने केली आहे.

स्वातंत्र्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला अन्य समाजाच्या बरोबरीने आणण्याकरिता आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली. परंतु आजपर्यंतची अंमलबजावणी बघितल्यास आरक्षण या समाजाला समानता किंवा न्याय देऊ शकले नाही; किंबहुना आरक्षण हे या समाजाला अपेक्षेप्रमाणे प्रतिनिधीत्वदेखील देऊ शकले नाही, संपूर्ण देशात आरक्षणाची अशी केविलवाणी स्थिती आहे, असे सह्याद्री याने म्हटले आहे.

आरक्षणाबाबत सर्वच पक्षांच्या नियतीत खोट असून, सर्वच सत्ताधारी पक्षांचे लोक भांडवलदार आणि स्वत:चे राजकीय हित जोपासण्यास प्राधान्य देतात. महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा मराठा नेत्यांनीच सत्ता उपभोगली आहे. यातून जे मूठभर दलाल नेते तयार झाले; तेच मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत, अशी टीका सह्याद्री याने केली असून, मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखावे, असे म्हटले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांचे एकेकाळचे सहकारी राहिलेले आणि त्यांच्याच इशाऱ्यावर चालणारे काही लोक संघटना तयार करुन मराठा समाजात मिरवीत आहेत. हे धोकेबाज असून, त्यांच्यापासून सावध राहावे, असे सह्याद्री याने म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या स्थापनेत मराठा समाजाने पुढकार घेतला होता. आता पुन्हा एकदा असा पुढाकार घेण्याची वेळ आली असून, मावळे बनून मैदानात उतरावे, असे आवाहन माओवादी नेता सह्याद्री याने केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
64MA7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना