गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

३८ लाखांचा खर्च होऊनही कुलगुरुंची निवड न होणे हे दुर्दैव: उदय सामंत

Monday, 14th June 2021 07:42:08 AM

गडचिरोली,ता.१४: ३८ लाख रुपयांचा खर्च होऊनही गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निवड होऊ नये, हे दुर्दैव असल्याचे मत व्यक्त करुन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यपाल कार्यालयाच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केली.

राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज उदय सामंत यांच्या हस्ते दोन व्हेंटिलेटर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत सामंत यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. श्री.सामंत म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज प्रभारी कुलगुरुमार्फत सुरु आहे. स्थायी कुलगुरुंच्या नियुक्तीसाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेवर ३८ लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु नवनियुक्त कुलगुरुंनी रुजू होण्यास नकार दिला. एवढी रक्कम खर्च होऊनही कुलगुरु रुजू होऊ नये, हे मोठे दुर्दैव असल्याचे उदय सामंत म्हणाले.

उदय सामंत यांनी सांगितले की, गोंडवाना विद्यापीठाकडे इन्फा्रस्ट्रक्चर आहे. विद्यापीठाला १५० एकर जागा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असून, सध्या ५० एकर जागेसाठी प्रशासनाकडे ४६ कोटी ५० लाख रुपये अदा करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या विद्यापीठामार्फत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करणे परवडणारे आहे. त्यामुळे गडचिरोली अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु केले जाईल, तसेच चंद्रपूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी ४ एकर जागाही देण्यात येणार आहे. शिवाय उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांचे कार्यालयही विद्यापीठात सुरु होणार आहे. त्यात सहसंचालक दोन दिवस बसतील आणि विद्यापीठाचे दोन कर्मचारी या कार्यालयाचे कामकाज पाहतील, असेही श्री.सामंत यांनी स्पष्ट केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंची निवड करण्याची प्रक्रिया विद्यापीठाकडून पूर्ण झाली असून, आता उर्वरित प्रक्रिया राज्यपाल कार्यालय करेल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
W4GAK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना