मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गोंडवाना विद्यापीठ जनसंपर्क अधिकाऱ्याला देणार फक्त १५ हजार रुपये वेतन

Tuesday, 20th July 2021 07:32:38 AM

गडचिरोली,ता.२०: येथील गोंडवाना विद्यापीठाने काढलेल्या वर्ग १ च्या तीन पदांपैकी जनसंपर्क अधिकारी या पदाकरिता केवळ १५ हजार रुपये वेतन आणि ३ महिन्यांची कालमर्यादा ठरवून दिली आहे. दरम्यान,जनसंपर्क अधिकाऱ्याला एखाद्या रोजंदारापेक्षाही कमी वेतन देणे हे चुकीचे असून यात तत्काळ सुधारणा करून सन्मानजनक वेतनाची तरतूद काण्यात यावी, अशी मागणी सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार यांनी केली आहे.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, या हेतूने  निर्माण करण्यात आलेले गोंडवाना विद्यापीठ स्थापनेपासूनच विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे. आता हे विद्यापीठ पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीने होत असलेल्या पदभरतीमुळे टीकेचे लक्ष होत आहे. नुकतीच विद्यापीठाने पदभरतीसंदर्भात जाहिरात काढली असून वर्ग १ च्या तीनही पदांना वेगवेगळी कालमर्यादा व वेतन ठेवले आहे. यातील ‘जनसंपर्क अधिकारी’ या महत्वाच्या पदाकरिता विद्यापीठ १५ हजार रुपये वेतन देणार असून,त्यासाठी केवळ ३ महिन्याची कालमर्यादा ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

विद्यापीठात नेहमीच समन्वयाचा अभाव दिसून येतो. इतकेच नव्हे, तर आतापर्यंतच्या दहा वर्षात विद्यापीठाची वाटचाल कशी सुरु आहे, शैक्षणिक कार्यातील काही महत्वाचे निर्णय, विद्यार्थी तसेच संशोधकांनी केलेले कार्य या सर्व बाबी माध्यम तसेच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विद्यापीठात नेमके काय चालू आहे, हे सांगणे कठीण होऊन बसते. या सर्व बाबी हाताळण्याकरिता प्रत्येक विद्यापीठात ‘जनसंपर्क अधिकारी’ हे पद असते. मात्र, गोंडवाना विद्यापीठात अद्याप हे पद भरण्यात आलेले नाही. ३ वर्षांपूर्वी हे पद भरण्याकरिता जाहिरात काढण्यात आली. परीक्षा व मुलाखतदेखील घेण्यात आली. परंतु नियुक्ती करण्यात आली नाही. विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे हे पद रिक्त राहिल्याची चर्चा त्यावेळी होती. पुढे कोरोनामुळे पुन्हा ही पदभरती रखडली होती.

अशातच मागील महिन्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री गडचिरोलीला आले असता त्यांनी हे पद भरण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने वैद्यकीय अधिकारी, विधी अधिकारी व जनसंपर्क अधिकारी ही तिन्ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भात जाहिरात काढली. परंतु ‘जनसंपर्क अधिकारी’ पदाकरिता केवळ १५ हजार रुपये वेतन ठेवण्यात आले. सोबतच केवळ ८९ दिवसांची कालमर्यादा घालण्यात आली. उर्वरित पदाकरिता मात्र सन्मानजनक वेतन व कालमर्यादा ठेवण्यात आली. अशाप्रकारे पदभरती केल्यास विद्यापीठाला कौशल्यपूर्ण अधिकारी कसे मिळणार, असा सवालही प्रशांत दोंतुलवार यांनी आपल्या निवेदनात केला आहे.

यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल चिताडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही पदभरती तात्पुरत्या स्वरुपाची असून विद्यापीठ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार वेतन ठरविल्याचे सांगितले. शासनाच्या मान्यतेनंतर स्थायी स्वरुपात पदभरती होईल आणि तेव्हा नियमानुसार वेतन देण्यात येईल, असेही डॉ.चिताडे यांनी स्पष्ट केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
D1DQS
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना