शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

असरअलीचे शिक्षक खुर्शिद शेख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

Wednesday, 18th August 2021 08:15:47 AM

गडचिरोली,ता.१८: सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख यांची केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज देशभरातून नामांकन केलेल्या १५५ शिक्षकांपैकी ४५ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यात असरअली येथील खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेश खोसे या दोन शिक्षकांचा महाराष्ट्रातून समावेश आहे.

काय केलं खुर्शिद शेख यांनी

सिरोंचा हे तालुकास्थळ गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून दोनशे किलोमीटर अंतरावर आणि असरअली हे गाव सिरोंचा तालुकास्थळापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर ते वसले आहे. असरअली गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. खुर्शिद शेख हे २०१३ मध्ये त्या शाळेत रुजू झाले, तेव्हा शाळेची पटसंख्या ४५ होती. शाळा जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर होती. शाळेच्या या स्थितीची शेख यांनी स्वत:च कारणमीमांसा करण्यास सुरुवात केली. राज्य शासनाची पुस्तके मराठी भाषेतून आहेत आणि असरअली परिसरातील नागरिकांची भाषा तेलगू आहे. भाषा हाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मुख्य अडसर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग, शेख यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. शाळेत आनंदबाग तयार केली. विज्ञान प्रयोगशाळा उघडली. व्हर्च्युअल क्लासरुमही उघडली. सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ग्रंथालय सुरु केलं. आज हे ग्रंथालय ३ हजार पुस्तकांनी सुसज्ज आहे. एवढेच नाही, तर ‘मी रिर्पोटर’ हा उपक्रमही सुरु केला. यामुळे विद्यार्थी माईकपुढे येऊन मराठी भाषा चांगल्याप्रकारे बोलू लागले. अशा वेगवेगळ्या आनंददायी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा भाषिक अडसर दूर झाला आणि बघताबघता शाळा गच्च भरायला लागली. आजमितीस या शाळेच्या ११ शॉर्ट फिल्म्स तयार झाल्या असून, विद्यार्थ्यांनीच त्यात अभिनय केला आहे.

खुर्शिद शेख यांनी तेलगू भाषिक विद्यार्थ्यांना मराठी भाषेप्रती रुची निर्माण करुन त्यांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण केल्याबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R0Q56
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना