/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
आरमोरी,ता.६: शालेय जीवनात शिक्षण घेणारे सर्व जुने विद्यार्थीमित्र आणि त्यांना शिस्तीचे धडे देणारे तेच शिक्षक तब्बल २८ वर्षानंतर एकत्र आले. जणू काही शाळेचा वर्गच भरल्याचा भास झाला .विद्यार्थी दशेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आपण घडविलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चांगल्या नोकरीवर आहेत, हे बघून शिक्षकांनाही आनंद झाला . आपण आज ज्या पदावर आहोत; ते केवळ शिक्षकामुळेच, ही जाणीव ठेवून आपल्या गुरुजनांचा आदर करताना विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही गहिवरून आलं.
निमित्त होतं शिक्षक दिनाचं. विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं जपणारा अनोखा सन्मान सोहळा आरमोरीतील केमिस्ट भवन येथे शिक्षक दिनी ५ सप्टेंबर ला पार पडला. सन १९९३ मध्ये महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता १० वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी हा सोहळा आयोजित केला होता. अनेक वर्षे शिक्षक म्हणून सेवा केलेले माजी आमदार हरिराम वरखडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी उच्च विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई गेडाम, कलिराम गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमात निवृत्त शिक्षक ताराचंद नागदेवे, मधुकर भोयर, यशवंत सोरते, नत्थुजी आकरे, अरुण कोयाडवार, ज्ञानेश्वर लोखंडे, शरद जोंजाळकर ,विजया मानकर,मालती मारोडकर,चंद्रकला सेलोकर या शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्माचिन्ह देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पारिवारिक सत्कार करण्यात आला .
दहावीपर्यंत एकाच वर्गात खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घेणारे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यावेळी विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक आता सेवानिवृत्त झाले आहेत. आपली नोकरी, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनात रमलेल्या १९९३ च्या दहावी बॅचचे ते विद्यार्थी तब्बल २८ वर्षांनंतर शिक्षक दिनी एकत्र आले होते. आपले विद्यार्थी हे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, याचा आनंद आणि बऱ्याच वर्षाच्या भेटीगाठीने विद्यार्थ्यांसह शिक्षकही भारावले. २८ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला सत्कार करून आदर व्यक्त करणे, हा जीवनातील सर्वात मोठा आनंद असल्याची भावना यावेळी माजी शिक्षकांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक डॉ. प्रदीप खोब्रागडे यांनी केले. संचालन प्रा. अमरदीप मेश्राम, तर आभार डॉ.मुखरू चिखराम यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नागसेन गोडसे, अरविंद डुंबरे, श्रीकांत गलमलकर, किशोर सेलोकर,सचिन वनमाळी, रवी गणवीर, रवी डोकरे, डॉ.अमोल धात्रक, डॉ.विजय निंबेकार, चंद्रशेखर गिरीपुंजे, मंगेश सदाफळे,रणजित बेहरे, अजय बोडे,मुबारक खान पठाण,महेंद्र दहिकर, भूषण चिखराम,निसार खान पठाण,योगेश दुमाने,प्रवीण दामले, प्रफुल ठवकर, प्रवीण रामपूरकर,यशकुमार सपाटे,श्रीनिवास मादेशी आदींनी सहकार्य केले.