/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१७:पोलिस महासंचालकातर्फे गडचिरोली पोलिस दलास सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक म्हणून ‘बेस्ट युनिट इन यूस ऑफ टेक्नॉलॉजी फॉर पोलिसिंग’ व ‘बेस्ट युनिट इन कॉम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटीव्ह’ हे दोन पुरस्कार दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. गडचिरोली पोलिस दलास अशाप्रकारचे दोन ‘सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक’ पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस घटकांची कार्यक्षमता, कामगिरी, निर्धारित कालावधीत उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या निकषानुसार गडचिरोली पोलिस दलाच्या जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीतील कामगिरीचे मूल्यांकन करुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असून, जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, पोलिसांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. एकीकडे नक्षल्यांशी दोन हात करताना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारीही पोलिसांना हाताळावी लागत असते. अशा परिस्थितीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी अतिशय खडतर सेवा बजावत असलेले सर्व अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.