गुरुवार, 2 डिसेंबर 2021
लक्षवेधी :
  गोंडवाना विद्यापीठात ‘इग्नू’चे अभ्यास केंद्र सुरु करण्याचा निर्णय             शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आ.डॉ.देवराव होळी यांच्या नेतृत्वात भाजपचा चामोर्शी तहसील कार्यालयावर मोर्चा             भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीमती आशा प्रशांत नाकाडे यांची नियुक्ती             नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मरकनार-मुरुमभुशी रस्त्याच्या कामावरील दोन ट्रॅक्टर जाळले             ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य शासन शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू करणार : इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती             कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस ५० हजारांची मदत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय: आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती           

ओडिशातून भटकलेल्या रानटी हत्तींच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Thursday, 21st October 2021 07:23:25 AM

गडचिरोली,ता.२१: ओडिशातून भटकलेल्या रानटी हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात दाखल झाले असून, शेतीचे नुकसान करीत आहेत. यातील एका हत्तीने केलेल्या हल्ल्यात धानोरा तालुक्यातील कन्हारटोला येथील अशोक मडावी नामक शेतकरी जखमी झाला आहे.

ओडिशा राज्यातील हत्तीचे भटकलेले कळप सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची व धानोरा तालुक्यात घुसले आहेत. कोरची तालुक्यातील टिपागड परिसर, कोटगूल व रानकट्टा भागातील जंगलात या हत्तींचा समूह फिरत होता. ४ व १५ ऑक्टोबरला या हत्तींनी रानकट्टा येथील धरमसिंग कुरचामी, लालसाय नैताम, निरंगू कोरचा, मन्साराम पुड़ो, नरसू कोरचा,सनकू गोटा,राजेश नैताम,पुनराम पदा, शेरकू कोरचा व अमरसिंग तुलावी या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले.वनविभागाने त्यांचे पंचनामेही केले आहेत. शिवाय काही नागरिकांनी परसबागेत लावलेल्या केळींचीही नासधूस हत्तींनी केली.

त्यानंतर हा समूह कुरखेडा तालुक्यातील मालेवाडामार्गे धानोरा तालुक्यातील येरकड, जपतलाई, कन्हारटोला इत्यादी गावांशेजारच्या जंगलात आला. हे हत्ती शेतीची नासधूस करीत आहेत. काल रात्री कन्हारटोला येथील एका शेतात हत्ती घुसले. यावेळी शेतमालक अशोक मडावी याने हत्तीला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्तीनेच त्याच्यावर हल्ला केला. यात तो जखमी झाला. त्याला नागपूरला हलविण्यात आले असून, वनविभाग त्याच्या उपचाराचा खर्च करणार असल्याचे गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांनी सांगितले. या हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. हत्तींनी मनुष्यावर हल्ले केल्याचे वन विभागाच्या पाहणीत आढळून आले नाही. मात्र, जेव्हा कोणत्याही जंगली प्राण्यांवर आपण हल्ला केला अथवा त्यांच्या वातावरणात व्यत्यय आणला, तर ते आक्रमक होऊन बचावासाठी मनुष्यावर हल्ला करतात. शिवाय मोठा आवाज केल्याने अथवा फटाके फोडल्यानेही ते मनुष्यावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे नागरिकांनी हत्तींना हुसकावून लावण्यासाठी त्यांच्या कळपामागे धावू नये, हत्तीला पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी तिकडे जाऊ नये, असे आवाहन डॉ.मानकर यांनी केले आहे.

नुकसान झाल्यास वन विभागाकडून पंचनामे: हत्तींच्या कळपामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी वन विभागाने पंचनामे केले आहेत. तसेच इतर ठिकाणी पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी आपल्या शेतातील झालेल्या नुकसानीची माहिती वन विभागाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांना द्यावी, त्यानंतर शेताचे पंचनामे करून संबंधितास नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया राबविली जाईल,असे मुख्य वनसंरक्षक डॉ.मानकर यांनी सांगितले.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
G45Y4
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना