गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गौतम निमगडे खून प्रकरणातील आरोपीस आरमोरी पोलिसांनी केले जेरबंद

Thursday, 25th November 2021 08:23:43 AM

गडचिरोली,ता.२५: आरमोरी शहरातील काळागोटा परिसरातील पंचशिल वॉर्डात राहणाऱ्या गौतम निमगडे यांचा खून करुन त्यांच्या पत्नीस जखमी करणाऱ्या आरोपीस आरमोरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. नीतेश प्रभाकर श्रीकुंटवार (२५) रा.काळागोटा आरमोरी असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,२३ नोव्हेबरला रात्री १ ते २ वाजताच्या दरम्यान आरोपी नीतेश हा दारू पिऊन गौतम निमगडे यांच्या घराजवळ असलेल्या एका बंद घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेला होता. आरोपी हा त्या घराचे कुलूप दगडाने तोडण्याचा प्रयत्न करीत असताना मृतक गौतम निमगडे यांना आवाज आला. त्यांनी आपल्या घराचा दरवाजा उघडून पाहताच शेजारच्या घरचे कुलूप कोणीतरी तोडत असल्याचे त्यांना दिसले. लगेच त्यांनी आरोपीस हटकले. यावेळी आरोपी नीतेश तेथून पळून गेला. यानंतर निमगडे दाम्पत्य दरवाजा लावून घरात गेले. मात्र, निमगडे यांच्यामुळे आपला चोरी करण्याचा प्रयत्न फसला, असे आरोपी नीतेश श्रीकुंटवार यास वाटले. त्याने हा राग मनात ठेवून अर्ध्या तासातच गौतम निमगडे यांचे घर गाठले. दरवाजावरील घंटी वाजविताच गौतम निमगडे यांनी दरवाजा उघडला. तेव्हा नीतेशने कुठलाही विचार न करता निमगडे यांच्या डोक्यावर दगडाने सपासप वार केले. निमगडे हे ओरडताच त्यांची पत्नी माया झोपेतून जागी झाल्या. त्यांनी आरोपीस अटकाव करण्याचा प्रयत्न केले असता, आरोपीने त्यांच्याही डोक्यावर दगडाने सपासप वार केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. या प्राणघातक हल्ल्यात गौतम निमगडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली.

मोबाईलमुळे सापडला आरोपी

निमगडे दाम्पत्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी नीतेश फरार झाला. मात्र, घटनास्थळी त्याचा मोबाईल पडला. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलच्या मालकाचा शोध घेतला. मात्र आरोपी फरार झाल्याने त्याला पकडण्याचे आरमोरी पोलिसांपुढे आव्हान होते. अशातच आरोपी हा ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही या गावात बहीण जावयाकडे असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी काल संध्याकाळी बरडकिन्ही येथे जाऊन आरोपी नीतेश श्रीकुंटवार याच्यावर भांदवि कलम ३०२,३०७ व ४५० अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. आज न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अवघ्या चोवीस तासांत आरोपीचा छडा लावल्याबद्दल पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक होत आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे आरोपी

आरोपी नीतेश श्रीकुंटवार हा विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, ,यापूर्वी त्याच्यावर ३७६ कलमांनव्ये आरमोरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. ९ नोव्हेंबरला तो चंद्रपूर कारागृहातून बलात्काराच्या खटल्यातून जामीनावर सुटून आरमोरीला आला होता. १५ दिवसांतच त्याने निमगडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून खून केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4516O
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना