बुधवार, 26 जानेवारी 2022
लक्षवेधी :
  दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मूल्ये आणि विकासाला अंगीकारल्याने गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती बदलत आहे: प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन             गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर             लसीकरणात गडचिरोली जिल्हयाची ३१ व्या क्रमांकावरून १६ व्या क्रमांकावर झेप-आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी केले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक             गडचिरोलीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा, नवमतदारांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप             २५ जानेवारी कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात ४३ जण बाधित, २०१ रुग्ण कोरोनामुक्त           

ओबीसी आरक्षणासाठी शेकाप राज्यव्यापी आंदोलन उभारणार : भाई रामदास जराते

Saturday, 18th December 2021 06:44:25 AM

गडचिरोली,ता.१८ : भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी आरक्षणाचा खेळखंडोबा करुन ओबीसी समाजाच्या अनेक पिढ्या उद्ध्वस्त केल्या आहेत. ओबीसींवरचा हा अन्याय दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करून आरक्षणाची तरतूद करणे हाच सक्षम पर्याय आहे.त्यासाठी राज्यातील प्रमुख ब्राम्हणेतर पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

स्थानिक पत्रकार भवनात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना भाई रामदास जराते बोलत होते. यावेळी जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा, भाई अशोक किरंगे, सरपंच दर्शना भोपये, डॉ.गुरुदास सेमस्कर, चंद्रकांत भोयर, राजकुमार प्रधान, संजय बोदलकर, कार्यालयीन चिटणीस भाई श्रीधर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, देशात ८५ टक्के जनता ही मागास प्रवर्गात मोडणारी आहे. त्यामुळे ८५ टक्के जनतेकरीता ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था हा अन्याय असून, तो दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती केली पाहिजे, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस राहिलेले दिवंगत पी.बी.सावंत यांनी जाहीरपणे मांडली होती. आजही हीच भूमिका शेतकरी कामगार पक्षाची असून सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वात यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करण्यात येत असल्याने ओबीसी, बहुजन समाजाने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा नाद सोडून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले.

दरम्यान कार्यकर्त्यांच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील खाणींना विरोध, ढिवर समाजाचे कोसा रानाच्या जमिनीचे पट्टे, माजी मालगुजारी तलावांची मालकी, गडचिरोली शहरातील वस्त्यांचे अतिक्रमणाचे पट्टे आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गडचिरोली नगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा आणि त्याकरिता पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीला भास्कर ठाकरे, गणेश बोबाटे, सत्तू गावळे, धनराज भोपये, हिराजी चिचघरे, रेवनाथ मेश्राम, देवा भोयर, किसन साखरे, शालिक भोयर, रमेश गेडाम, बाजीराव आत्राम, भूषण बांबोळे, पत्रू कोटगले, देवेंद्र लाटकर,वसंत वधेलवार, शिल्पा लटारे, छाया भोयर, रजनी खैरे, कुसूम नैताम, चंदा सोनटक्के, शालु आभारे, सतिका खोब्रागडे, खुशाली बावणे, मनिषा हजारे, धारा बन्सोड, विमल क्षिरसागर, आरती मडावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
X5491
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना