/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२२: चित्रपट हे केवळ करमणुकीचे साधन नसते, तर त्या चित्रपटाचा आस्वाद घेतल्यानंतर समस्येची सोडवणूक व्हायला पाहिजे. हजार शब्दापेक्षा एक चित्रपट समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरतो, असे प्रतिपादन अजय गंपावार यांनी केले.
कुरखेडा येथे ‘मावा’ संस्था, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ आणि श्री. गोविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समभाव’ या विषयावरील दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे आभासी पद्धतीने उद्घाटन श्री.गंपावार यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, मावा संस्थेचे सहसंस्थापक हरीश सदानी, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संस्थापक डॉ.सतीश गोगुलवार, जिल्हा परिषद सदस्य एड. लालसू नोगोटी, वंदना मुनघाटे, शुभदा देशमुख उपस्थित होते.
अजय गंपावार पुढे म्हणाले,समाजात काही विषयांवर खुल्या मनाने बोलले जात नाही. पण, खुलेपणाने बोलण्याचे कार्य चित्रपटच्या माध्यमातून होत असते . भारतीय संविधानाने समानता हे तत्त्व सांगितले. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. एक फोटो हजार अंगाने काम करतो. एवढे मोठे तत्त्वज्ञान या फिल्म फेस्टीवलमध्ये आहे.
डॉ.प्रमोद मुनघाटे म्हणाले की , हजारो पुस्तके वाचून जे कळू शकत नाही; ते चित्रपटातून कळते. स्त्री विषमतेवर चर्चा करताना केवळ महिलांनाच प्रशिक्षित केले पाहिजे असे नाही, तर पुरुषांमध्येही नवीन दृष्टिकोन कसा निर्माण करता येईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
दोन दिवस चाललेल्या या चित्रपट महोत्सवात नटखट, मैदा, सन्डे, ब्लॅक रोजेस ड्रेसेस ग्रुप ,ज्यूस, उंबरठा ,सुंदर अशा विविध भाषांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले समभाव निर्माण करणारे व लिंग समानतेचा संदेश देणारे चित्रपट दाखविण्यात आले. या दोन दिवसात एकूण चौदा चित्रपटांचे सादरीकरण करण्यात आले त्याचे सादरीकरण मावा संस्थेचे प्रवीण थोटे यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर,तर आभार प्रदर्शन डॉ.गणेश सातपुते यांनी केले.चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी मूवी क्लबचे प्रा. भास्कर तुपटे, रासेयो विभागप्रमुख डॉ.गुणवंत वडपल्लीवार, डॉ.रवींद्र विखार, डॉ. निवडुंगे, आशिष बगमारे, डॉ.महाजन, डॉ.शंभरकर, डॉ. बनसोड, प्रा. कौस्तुभ राऊत आदींनी सहकार्य केले.