शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्ह्यात ९ पैकी ६ नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व, कुरखेड्यात भाजप, सिरोंचात आविसं, अहेरीत त्रिशंकू

Thursday, 20th January 2022 03:16:10 AM

गडचिरोली,ता.२०: जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींपैकी ६ नगर पंचायतींमध्ये मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र, दक्षिणेकडील अहेरीत त्रिशंकू स्थिती असून, सिरोंचात आदिवासी विद्यार्थी संघाने विजयी पताका फडकावली आहे. एटापल्ली नगर पंचायतीमध्ये सत्तेची चावी अपक्ष आणि आदिवासी विद्यार्थी संघाच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढली, तर शिवसेनेने काही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसशी, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली होती. मात्र, शिवसेनेला केवळ कुरखेडा व मुलचेरा या दोन ठिकाणी अनुक्रमे ५ आणि ४ जागा जिंकता आल्या. अहेरी व सिरोंचा येथे शिवसेनेला प्रत्येकी दोन, तर भामरागडमध्ये एक जागा मिळाली. कोरची, धानोरा व चामोर्शी या नगर पंचायतींमध्ये शिवसेनेला, तर अहेरी, मुलचेरा आणि सिरोंचा नगर पंचायतीत काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. पूर्वोत्तर धानोरा व कुरखेडा नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी शून्य राहिली, तर कोरचीत केवळ एक जागा पदरात पडली.

प्रत्येक नगर पंचायतीमध्ये १७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात धानोरा नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकून एकहाती सत्ता प्रस्थापित केली. व्यापारिकदृ्ष्ट्या महत्वाच्या आणि लोकसंख्येने मोठ्या असलेल्या चामोर्शी नगर परिषदेत काँग्रेसने ८, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागा जिंकल्या. तेथे भाजपच्या प्रमुख नेत्यांचा पराभव होऊन केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचे आमदार डॉ.देवराव होळी यांचा चामोर्शी हा गृहतालुका आहे. परंतु त्यांच्या पदरी निराशा आली. कुरखेडा येथे भाजपने ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. तेथे शिवसेना-काँग्रेस आघाडी होती. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या ताकदीमुळे शिवसेनेला ५ जागा मिळाल्या, तर काँग्रेसने ३ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला येथे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कुरखेड्यात भाजपचे आमदार कृष्णा गजबे, सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांचे प्रयत्न फळाला लागल्याचे दिसून आले. कोरचीमध्ये ८ जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. भाजपने तेथे ६ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसला एक, तर अपक्षांनी दोन जागा जिंकल्या.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा आणि भामरागड या नगर पंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि भाजपचे माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अहेरीत भाजपने सर्वाधिक ६ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादीला ३, तर सोबत असलेल्या शिवसेनेला २ जागा मिळाला. येथे आदिवासी विद्यार्थी संघाने ५ जागा जिंकून सत्तेची चावी आपल्याकडे ठेवली आहे. मुलचेरा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ६, शिवसेनेला ४, अपक्ष २ आणि भाजपने १ जागा पटकावली.

सिरोंचामध्ये आदिवासी विद्यार्थी संघाने सर्वाधिक १० जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली. राष्ट्रवादी काँग्रेसला ५, तर शिवसेनेला २ जागा मिळाल्या. एटापल्लीत काँग्रेसला ५, राष्ट्रवादी काँग्रेसला ३, अपक्ष ४, आदिवासी विद्यार्थी संघाला २, तर भाजपला ३ जागांवर विजय संपादित करता आला. भामरागडमध्ये काँग्रेसला २, राष्ट्रवादी काँग्रेसला ३, भाजप ५, शिवसेना १, अपक्ष ३, आविसंने ३ जागांवर विजय प्राप्त केला.

सर्वाधिक ३९ जागा काँग्रेसला

गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगर परिषदांमध्ये प्रत्येकी १७ अशा एकूण १५३ जागांसाठी निवडणुकीत सर्वाधिक ३९ जागा जिंकून काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला ३६, राष्ट्रवादी काँग्रेसला २६, आदिवासी विद्यार्थी संघ २४, शिवसेना १४ तर अपक्षांना १४ जागा मिळाल्या आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सरचिटणीस डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी आदींनी काँग्रेसला बहुमत मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे.

धर्मरावबाबा आत्राम यांना मोठा झटका

अहेरी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली आणि भामरागड या नगर पंचायतींमध्ये जबर फटका बसला आहे. मुलचेरा नगर पंचायतीत राष्ट्रवादीला ६ जागा मिळवता आल्या. अहेरी, एटापल्ली आणि भामरागडमध्ये प्रत्येकी ३ जागा आणि सिरोंचात ५ जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. शिवसेनेशी आघाडी करुनही राष्ट्रवादीच्या पदरात घोर निराशा आली आहे.

आदिवासी विद्यार्थी संघाची दमदार एन्ट्री

माजी आमदार दीपक आत्राम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाने अहेरी विधानसभा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आविसंने सिरोंचा नगर पंचायतीत तब्बल १० जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली, तर अहेरी या धर्मरावबाबा आत्राम यांच्या गृहशहरात ५ जागा जिंकून धोबीपछाड केले आहे. भामरागड व एटापल्ली येथे आविसंचे अनुक्रमे ३ व २ उमेदवार विजयी झाले आहेत.

एकनाथ शिंदेचा फारसा प्रभाव नाही

राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी जवळपास सर्वच ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. परंतु त्यांना अपेक्षेएवढे यश मिळाले नाही. शिवसेनेने काही ठिकाणी काँग्रेसशी, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीशी आघाडी केली होती. या दोन पक्षांच्या भरवश्यावर शिवसेनेला केवळ १४ जागा मिळवता आल्या. मात्र, दक्षिण गडचिरोलीत शिवसेनेने एन्ट्री केली, हे महत्वाचे मानले जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SNZ0M
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना