/* */
रविवार, 22 मे 2022
लक्षवेधी :
  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश             कमलापूचे हत्ती जामनगरला नेण्याच्या विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन, तर भाजपने केला चक्काजाम             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

किशोर पोतदार गडचिरोली जिल्ह्यात करु शकतात चमत्कार!

Saturday, 22nd January 2022 02:42:06 AM

गडचिरोली,ता.२२: नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रथमच १४ जागा जिंकून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, जेथे शिवसेना संपली होती; त्या दक्षिण गडचिरोलीतील पाच नक्षलग्रस्त तालुक्यांमध्ये ९ जागा निवडून आणण्याची किमयाही शिवसेनेने केली आहे. या विजयाचे खरे शिल्पकार म्हणून शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांच्याकडे बघितले जात आहे.

शिवसेनेला दक्षिण गडचिरोलीतील मुलचेरा नगर पंचायतीत ४, अहेरीत २, सिरोंचा येथे २ आणि भामरागडमध्ये १ अशा एकूण ९ जागा मिळाल्या. आणखी काही अपक्ष नगरसेवकही शिवसेनेत आल्याने ही संख्या वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेने शून्यातून एकदम अशी झेप कशीकाय घेतली,हा प्रश्न राजकीय मंडळींना सतावू लागला आहे. मात्र, ‘किशोर पोतदार’ एवढेच या प्रश्नाचे उत्तर देता येईल.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर किशोर पोतदार यांना शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख बनविण्यात आले. जबाबदारी येताच पोतदार गडचिरोलीत आले. त्यांनी गटागटात विभागलेल्या शिवसैनिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. चांगल्या कार्यकर्त्यांची छाननी केली आणि जनसंपर्क असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना पदे दिली. मागच्या वर्षी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी किशोर पोतदार यांनी जिल्हा सहसंपर्कप्रमुख विलास कोडापे आणि अरविंद कात्रटवार यांना सोबत घेऊन स्वत: खेड्यापाड्यात सभा घेतल्या. परिणामी काही ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली.

अजूनही पोतदार हे पंधरा-पंधरा दिवस गडचिरोलीत राहून जनसंपर्क करतात. मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीतला माणूस दुर्गम् व् नक्षलग्रस्त भागात पंधरा दिवस घालवतो, हे जिल्ह्यातील शिवसैनिक प्रथमच अनुभवत आहेत. नगर पंचायत निवडणुकीत ते सिरोंचापर्यंत जाऊन आले. (सोबत सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे आणि अहेरी जिल्हाप्रमुखांचं सहकार्य होतंच.) त्यांनी प्रत्येक ठिकाणी बारकाईनं लक्ष ठेवलं. शिवसेनेला जे यश मिळालं, ही याच मेहनतीची फळं आहेत, असं म्हणता येईल. प्रसिद्धीपासून स्वत: दूर राहून पोतदार यांनी हे करुन दाखवलं आहे. व्यवस्थित नियोजन केलं तर किशोर पोतदार यांच्या नेतृत्वात आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत चमत्कार करु शकते, असे जाणकारांना वाटत आहे.

नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे लक्ष

गडचिरोली आणि देसाईगंज नगर परिषदांची मुदत संपली आहे. पुढील महिन्यात जिल्हा परिषदेचीही मुदत संपत आहे. त्यामुळे एक-दोन महिन्यांत दोन्ही निवडणुका होऊ शकतात. शिवसेनेला या निवडणुकांमध्ये चांगली संधी आहे. परंतु गडचिरोली विधासभा क्षेत्रातील चामोर्शी आणि धानोरा या दोन नगर पंचायतीत शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. आता तोंडावर गडचिरोली नगर परिषदेची निवडणूक आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या जिल्हाप्रमुखाबाबत वरिष्ठ नेत्यांना विचार करावा लागणार आहे.

‘त्या’ नागपुरी नेत्याचं नेमकं काम कोणतं?

सध्या शिवसेनेचा एक नागपुरी नेता गडचिरोलीत बरेचदा येताना दिसतो. पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत आले की त्यांचे मोठमोठे होर्डिंग्ज लावणे आणि शिंदे यांच्या मागे सावलीसारखे उभे राहणे, हे एकमेव काम या नेत्याचे आहे. हा नेता मध्येमध्ये हस्तक्षेप करीत असल्याने अनेक शिवसैनिक नाराज आहेत. या नाराजीचा एक दिवस स्फोट होईल, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
96YWX
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना