/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२७: कर्जमाफी, वीजबिल, धानाचे चुकारे, बंद असलेली धान खरेदी केंद्रे आणि अन्य विषयांवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ४ एप्रिलला गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
खा.नेते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार दळभद्री असून, सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सत्तेत येताच या सरकारने धानाला सातशे रुपये बोनस जाहीर केला होता. परंतु दोन वर्षांपासून बोनस मिळालेला नाही. रीडिंग न घेताच शेतकऱ्यांना अवाढव्य बिल पाठविण्यात येत असून, कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी केली नाही. उलट सक्तीची कर्जवसुली केली जात आहे, असा आरोप खा.नेते यांनी केला. नवाब मलिक यांच्याविरोधात देशद्रोह्यांना सहकार्य केल्याचे पुरावे असताना त्यांना मंत्रिमंडळात काढून का टाकण्यात येत नाही, असा सवालही खा.नेते यांनी केला. एकूणच शेतकऱ्यांच्या समस्या,ओबीसी आरक्ष्ण व इतर प्रश्नांवर ४ एप्रिलला गडचिरोलीत मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी वित्तमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार हे या मोर्चाचे नेतृत्व करणार असून, जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० हजार नागरिक त्यात सहभागी होतील, अशी माहितीही खा.नेते यांनी दिली.
पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, आ.डॉ.देवराव होळी,आ.कृष्णा गजबे, महासचिव रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, बाबूराव कोहळे, प्रशांत वाघरे, गोविंद सारडा, रमेश भुरसे, डॉ.भारत खटी, प्रकाश गेडाम, अनिल कुनघाडकर, रेखा डोळस, माधव कासर्लावार उपस्थित होते.