/* */
शनिवार, 30 सप्टेंबर 2023
लक्षवेधी :
  गडचिरोली:सिझेरियन प्रसूती झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ             लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या घडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार, १ जखमी-चामोर्शी येथील घटना             ३३ टक्के आरक्षण देऊन पंतप्रधानांनी महिलांचा सन्मान केला: खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन           

ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारमुळेच रद्द : देवेंद्र फडणवीस

Monday, 4th April 2022 06:53:51 AM

गडचिरोली,ता.४: केंद्र सरकारने मागितल्यानंतरही तब्बल दीड वर्षे महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा इंपिरिकल डाटा दिला नाही. त्यामुळे ओबीसींचं आरक्षण रद्द झालं. सरकारमधील काही मंत्री ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र रचताहेत. एकूणच हे सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची घणाघाती टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने गडचिरोली येथे आयोजित जनआक्रोश सभेत ते बोलत होते.या सभेला माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.अशोक नेते, भाजपचे पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ.बंटी भांगडिया, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम, भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, सहकारमहर्षी प्रकाश पोरेड्डीवार, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, बाबूराव कोहळे, प्रमोद पिपरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ओबीसींचं आरक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाचवलं. १३ डिसेंबर २०१९ ला केंद्र सरकारने राज्य सरकारला इंपिरिकल डाटा मागितला होता. परंतु राज्य सरकारनं दीड वर्षे तो दिला नाही. परिणामी आरक्षण घालवलं गेलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० मॅच सुरु असून, या लुटारुंच्या विरोधात जनतेत प्रचंड आक्रोश आहे. वीज बिल भरले नाही म्हणून सरकार गोरगरीब शेतकऱ्यांच्या कृषिपंपांच्या वीज जोडणी कापत आहे. मात्र, दुसरीकडे, मुंबईतील बिल्डरांचा २ हजार ३०० कोटींचा कर माफ केला जातो. कोरोना काळात सरकारने विदेशी दारुवरील कर अर्ध्यावर आणला. यावरुन हे सरकार बेवड्यांचे आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

कोरोनाच्या चोवीस महिन्यांच्या काळात मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे चारशे कोटी रुपयांची संपत्ती कुठून आली, असा सवाल करुन श्री.फडणवीस यांनी सरकारवर तोफ डागली. याप्रसंगी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा.अशोक नेते, आ. कृष्णा गजबे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र ओल्लालवार, तर आभार प्रदर्शन प्रशांत वाघरे यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KS8EO
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना