/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१४: चार दिवसांपूर्वी कुजलेला मृतदेह आढळल्याने दूषित पाणीपुरवठा होत असून, शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या स्वच्छ करुन त्यांचे निर्जंतुकीकरण करावे, तसेच जलकुंभाच्या ठिकाणी चोवीस तास देखरेख करणाऱ्या चौकीदाराची नेमणूक करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी बाळू टेंभुर्णे, जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे यांच्या नेतृत्वात जिल्हा कोषाध्यक्ष जी.के.बारसिंगे, महिला नेत्या माला भजगवळी, सीमा दुर्गे, अश्विनी चौधरी, रोशना शिंपी, अपर्णा आंबोरकर, माला मेश्राम, युवक आघाडीचे संदीप शहारे, रोहित टेंभुर्णे, प्रफुल्ल मेश्राम आदींनी उपमुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. १० जून रोजी एका युवकाचा मृतदेह चक्क शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपमध्ये आढळला होता. तब्बल चोवीस तास मृतदेह पाईपमध्ये कुजलेल्या अवस्थेत राहिल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागले. त्यानंतरही नागरिकांना दूषित पाणीपुरवठा झाला. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सर्वच जलकुंभाच्या वरच्या भागात जाळी लावण्यात यावी, दरमहा प्रत्येक नळधारकाच्या पाण्याचे, तसेच सार्वजनिक विहिरी आणि हातपंपाच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून पाण्याचे शुद्धीकरण करावे, प्रत्येक आठवड्यात गटारांची साफसफाई करावी, डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी, खोदून ठेवलेल्या गटारांचे तत्काळ बांधकाम करावे इत्यादी मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.