/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२९: नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना पोलिसांनी यूएपीए कायद्यान्वये अटक केली आहे. डॉ. पवन उईके, प्रफुल्ल देवानंद भट (२८) व अनिल गोकुळदासभट(२८) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. प्रफुल्ल आणि अनिल भट हे कमलापूर येथील, तर डॉ.उईके हा गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील मूळ रहिवासी आहे. त्याची पत्नीदेखील अहेरी तालुक्यात वैद्यकीय अधिकारी असल्याची माहिती आहे.
दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. यादरम्यान ते मृत नक्षल्यांची स्मारके उभारुन बॅनर बांधतात. काल(ता.२८) पोलिस कर्मचारी कमलापूर परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना गावानजीकच्या रस्त्यावर बॅनर बांधताना पोलिसांनी उपरोक्त तीन जणांना पकडले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
पवन उईके हा कमलापूर प्राथमिक आरोग्य केद्रात वैद्यकीय अधिकारी, तर प्रफुल्ल भट हा १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा चालक असल्याची माहिती आहे. तिन्ही जणांना आज अहेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पोलिस चौकशीनंतर प्रशासकीय कारवाई करु: कुमार आशीर्वाद, जि.प.सीईओ
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पवन उईके यास पोलिसांनी अटक केली आहे. सध्या चौकशी सुरु आहे. त्यात गुन्हा निष्पन्न झाल्यास दोषी डॉक्टरवर प्रशासकीय कारवाई करु, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ‘सांगितले.