शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कोरचीत १७ पैकी १३ प्रभारी अधिकारी करणार ध्वजारोहण

Sunday, 7th August 2022 12:20:06 AM

नंदकिशोर वैरागडे/कोरची,ता.७: संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना कोरची तालुक्यातील जनतेला मात्र विकासाच्या अमृताची चव अजूनही चाखायला मिळाल्याचे दिसत नाही. महत्वाच्या १७ कार्यालयांपैकी १३ कार्यालये प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरु असून, यंदाच्या स्वातंत्र्यदिनी तेच ध्वजारोहण करणार आहेत.

पूर्वीच्या विस्तीर्ण आणि दुर्गम कुरखेडा व धानोरा तालुक्याचे विभाजन करुन १९९२ मध्ये कोरची तालुक्याची निर्मिती करण्यात आली. पुढे कोरची या तालुकास्थळी तहसील कार्यालय,पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामीण रुग्णालय, वीज वितरण कंपनी, महिला व बाल विकास कार्यालय, शिक्षण विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, पोलिस ठाणे, शासकीय आश्रमशाळा, नगरपंचायत, वनपरिक्षेत्र कार्यालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी विकास महामंडळ अशी सुमारे १७ शासकीय कार्यालये सुरू करण्यात आली. त्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली.परंतु सुरुवातीपासूनच अनेक कार्यालयांना रिक्त पदांचे ग्रहण लागले, ते आजतागायत जैसे थे आहे.

१७ पैकी वनपरिक्षेत्र कार्यालय, कृषी कार्यालय,पोलिस ठाणे,भूमी अभिलेख इत्यादी कार्यालयांचा अपवाद वगळता अन्य १३ कार्यालयांमध्ये प्रभारी अधिकारीच आहेत. हेच अधिकारी यंदा स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करणार आहेत. प्रभारी अधिकारी असल्याने महत्वाची विकास कामे रेंगाळलेली आहेत. फायली पुढे सरकत नाही आणि सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो, असे सध्याचे चित्र आहे.

आदिवासींचा तालुका म्हणून दुर्लक्ष का?

कोरची तालुका आदिवासीबहुल आहे. आदिवासींची लोकसंख्या लक्षात घेता पेसा कायद्यान्वये संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंचांची पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. शिवाय जिल्हा परिषद सदस्यांची दोन्ही पदे आणि पंचायत समिती सदस्यांची ४ पैकी ३ पदेही अनुसूचित जमातीसाठीच राखून ठेवण्यात आली आहेत. एकूणच आदिवासींचा तालुका म्हणून शासन या तालुक्याकडे दुर्लक्ष करुन सापत्न वागणूक देत आहे काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
506V0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना