गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

शेतकऱ्याची आत्महत्या: जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यासह दोषींवर गुन्हे दाखल करण्याची नातेवाइकांची मागणी

Sunday, 11th September 2022 02:23:44 AM

गडचिरोली,ता.११: एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खाणीतून वाहून आलेल्या लाल मातीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने आणि मागणी करुनही जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाई न दिल्याने अजय टोप्पो नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली. यासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांचे सहकारी अधिकारी दोषी असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मृत अजय टोप्पो याच्या नातेवाईकांनी काल(ता.१०) पत्रकार परिषदेत केली.

मृतक अजय टोप्पो यांची पत्नी उर्मिला, मुलगा रोशन, भाऊ जगतपाल आणि वडील दिलराम टोप्पो यांनी सांगितले की, एट्टापल्ली तालुक्यातील मलमपाडी येथील आदिवासी उराँव जमातीतील शेतकरी अजय दिलराम टोप्पो (३८) यांनी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या शेतात सुरजागड लोहखाणीतून पावसामुळे लाल मातीचा गाळ वाहून आल्यामुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. अशातच मंगेर या गावी  जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यासह अन्य अधिकारी आले होते. त्यावेळी अजय टोप्पो यांनी आपबिती सांगून भरपाई देण्याची मागणी केली. परंतु जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी, तुम्ही आदिवासी नाहीत. त्यामुळे तुम्हाला वनहक्क दावा मंजूर होऊ शकत नाही, तुम्हाला आज ना उद्या ही जमीन सोडून द्यावी लागणार आहे, जमिनीची काहीच कागदपत्रे नसल्याने तुम्हाला भरपाई देऊ शकत नाही, असे उत्तर दिले. या उत्तराने दुखावलेल्या अजय टोप्पो यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. असे मृतक अजय टोप्पोच्या नातेवाईकांनी सांगितले. विशेष म्हणजे उराँव जमात ही आदिवासी जमात असून, शासनानेच दिलेले जातीचे प्रमाणपत्रही आमच्या कुटुंबीयांकडे उपलब्ध आहे, असे नातेवाईकांनी सांगितले.

अजय टोप्पो यांची आत्महत्या ही जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे झाली. मात्र, पोलिस विभागाच्या मदतीने दबाव टाकून आत्महत्येचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल (ता.९) हेडरी येथील पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून एका कोऱ्या कागदावर सर्वांच्या सह्या घेतल्या, त्यावर पोलिसांनी काय लिहिले, हेही आम्हाला सांगितले नाही, असे मृतकाचा भाऊ जगतपाल याने पत्रकार परिषदेत सांगितले.

सुरजागड लोह खाणीमुळे आज एका शेतकऱ्याने आत्महत्या करुनही जिल्हाधिकारी संजय मीणा कंपनीचे खासगी अधिकारी असल्याच्या अविर्भावात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला खोटे ठरवून पोलिसांमार्फत आत्महत्येचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब दुर्दैवी असून आदिवासी शेतकरी अजय दिलराम टोप्पो यांना न्याय मिळण्यासाठी निष्पक्षपणे चौकशी व्हावी व जिल्हाधिकारी संजय मीणा आणि इतर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी केली. हीच मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, सुरजागड पारंपरिक इलाक्याचे प्रमुख, माजी जि.प.सदस्य सैनू गोटा, ॲड.लालसू नोगोटी, मलमपाडीचे ग्रामसभा अध्यक्ष अशोक बडा, सुरजागडच्या माजी सरपंच कल्पना आलाम, मंगेश नरोटे, तुकाराम गेडाम यांनीही यावेळी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

मृतक अजय टोप्पो याच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण पाठविले आहे. अजय टोप्पोच्या नावे शेजजमीन नाही. तो कर्जबाजारीही नव्हता. त्याने घरगुती कारणांमुळे आत्महत्या केली, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सुरजागड लोहखाणीमुळे ज्यांचे नुकसान झाले; त्यांना कंपनीतर्फे भरपाई देण्यात येणार आहे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी मृतक अजय टोप्पो हा आदिवासीच नाही, असा पुनरुच्चार केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1DS4Y
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना