/* */
शनिवार, 30 सप्टेंबर 2023
लक्षवेधी :
  गडचिरोली:सिझेरियन प्रसूती झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ             लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या घडकेत एकाच कुटुंबातील ३ जण ठार, १ जखमी-चामोर्शी येथील घटना             ३३ टक्के आरक्षण देऊन पंतप्रधानांनी महिलांचा सन्मान केला: खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन           

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे नवे पालकमंत्री

Saturday, 24th September 2022 08:36:42 AM

गडचिरोली,ता.२४: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

३० जून २०२२ रोजी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून जवळपास तीन महिने अनेक जिल्ह्यांना पालकमंत्रीच नव्हते. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय पालकमंत्र्यांअभावी विकासकामेही खोळंबली होती. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. त्यानुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांची धुरा सोपविण्यात आली आहे.

दुसरे हेवीवेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, चंद्रकांतदादा पाटील-पुणे, विजयकुमार गावीत-नंदुरबार, गिरीश महाजन-धुळे, संजय राठोड-यवतमाळ, वाशिम, लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील-बुलढाणा, दादा भुसे-नाशिक, सुरेश खाडे-सांगली, संदीपान भुमरे-औरंगाबाद, उदय सामंत-रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद, रवींद्र चव्हाण-पालघर, सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार-हिंगोली, दीपक केसरकर-मुंबई शहर, कोल्हापूर, अतुल सावे-जालना, बीड, शंभुराजे देसाई-सातारा, ठाणे, मंगलप्रभात लोढा-मुंबई उपनगर अशी नव्या पालकमंत्र्यांची नावे आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गडचिरोलीत मुक्काम करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले होते. जलयुक्त शिवारसारखी महत्वाकांक्षी योजना त्यांनी राबविली. मात्र, आता त्यांच्यापुढे गडचिरोलीचा विकास करण्याबरोबरच सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचेही आव्हान असणार आहे. सुरजागड लोहप्रकल्पाबाबत अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेत प्रचंड असंतोष आहे. आलापल्ली-सिरोंचा रस्त्याच्या दैनावस्थेमुळेही लोक अस्वस्थ आहेत. वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना पट्टे देण्याबाबतही प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करताना दिसत नाही. अलीकडेच एटापल्ली तालुक्यातील मलमपाडी येथील एका आदिवासी शेतकऱ्याने सुरजागड प्रकल्पातून येणाऱ्या लाल मातीमुळे पीक उद्ध्स्त झाल्याने आत्महत्या केली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी नाही, तुला जमिनीचा पट्टा मिळणार नाही. तू शेतकरीच नाही, असे म्हटल्याने आत्महत्या करावी लागली, असा आरोप केला जात आहे. यामुळेही आदिवासींमध्ये तीव्र असंतोष आहे. कमलापूरचे हत्ती गुजरातला नेण्यावरुनही नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नवे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे प्रकरण संवेदनशिलपणे हाताळावे लागणार आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
D8SV4
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना