/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१४: मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातील प्रकरण सध्या न्यायालयात सुरु असून, त्यांच्या विरोधातील आपली लढाई सुरुच राहील, असे भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज येथे सांगितले.
मागील आठ दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या चित्रा वाघ यांनी आज गडचिरोलीत पत्रकार परिषद घेतली. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केलेला आहे, तो आपण अद्यापही मागे घेतलेला नाही. त्यामुळे लढाई सुरुच राहील, असे श्रीमती वाघ म्हणाल्या.
महिनाभरापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील एलचिल परिसरात सुरजागड पहाडावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाने आदिवासी महिलेवर केलेला बलात्कार दुर्दैवी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पुढाकार घेणार आहे. सोबतच पीडित महिलेला मनोधैर्य योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.
भाजपचे सरकार आल्यास महिलांवरील अत्याचार थांबतील, असा दावा आम्ही कधीच केला नाही. मात्र, ते कमी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी राज्य सरकार उपाययोजना राबवीत आहे. यासंदर्भातील भूमिका महत्वाची आहे, असे वाघ यांनी सांगितले.
राज्य सरकारने शंभर दिवसांत अडीचशे परिपत्रके काढली. सरकार प्रत्येक घटकांसाठी काम करीत असून, शेतकऱ्यांना यंदा तिप्पट मदत केली, असेही त्या म्हणाल्या. यापुढे प्रत्येक बूथवर २५ महिला असाव्यात, यासाठी भाजपची महिला आघाडी प्रयत्नशिल असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजपला लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा मिळतील, असा दावाही श्रीमती वाघ यांनी केला.
पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य रेखा डोळस, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर, भाजपचे जिल्हा महासचिव प्रमोद पिपरे, गोविंद सारडा, गीता हिंगे, लता पुंगाटी, वर्षा नैताम उपस्थित होते.