/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१७:अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने भरपाई जाहीर केली खरी; परंतु पात्र लाभार्थींना डावलून जे शेतकरीच नाहीत अशांना भरपाई देण्याचा अफलातून प्रकार अहेरी तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथे उघडकीस आला आहे. यासंदर्भात गावातील शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे निवेदन दिले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या दक्षिण भागात अतिवृष्टी झाली. त्याचा सर्वाधिक फटका सिरोंचा आणि अहेरी या दोन तालुक्यांना बसला. त्यानंतर राज्य शासनाने पंचनामे करण्याचे आदेश देऊन आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधी जाहीर केला. मात्र, पंचनामा करणाऱ्या यंत्रणेने शक्कल लढवून मदतनिधीतून मलाई लाटण्याचे मनसुबे आखले. व्यंकटरावपेठा गावात संबंधित यंत्रणेने चक्क खोटे शेतकरी उभे करुन खऱ्या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले.ज्यांच्या नावे अजिबात शेती नाही;अशांनाही शेतकरी दाखवून भरपाई दिली गेली. एकाच सातबारावर अनेक जणांना भरपाईची रक्कम देण्यात आली.
विशेष म्हणजे काही निरक्षरांच्या खात्यावरही भरपाईची रक्कम टाकून त्यांच्यामार्फत ती विड्रॉल करवून गिळंकृत करण्यात आली, अशा नाना तक्रारी शेतकऱ्यांनी माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. नुकसानीचे पुनर्सर्वेक्षण करुन खऱ्या पीडित शेतऱ्यांना मदत मिळवून द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार: अम्ब्रिशराव आत्राम
अहेरी तालुक्यातील केवळ व्यंकटरावपेठाच नव्हे; तर बोरी, महागाव, वांगेपल्ली, चिंचगुंडी, देवलमरी, आवलवरी इत्यादी ग्रामपंचायतीमध्येही असाच घोळ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर अम्ब्रिशराव आत्राम यांनी हा प्रकार गंभीर असून, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करुन अन्यायग्रस्तांना न्याय मिळविण्याबरोबरच दोषींवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिले.