बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

शेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत पाच महत्वाचे ठराव पारीत

Saturday, 26th November 2022 05:38:37 AM

गडचिरोली,ता.२६: येथे सुरु असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीच्या आजच्या पहिल्या दिवशी शेती, महिला, गायरान जमिनी आणि ५ च्या अनुसूचीसंदर्भातील महत्वाचे पाच ठराव समिती सदस्यांच्या अनुमोदनासह सर्वानुमते पारीत करण्यात आले.

शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, आ.श्यामसुंदर शिंदे, ज्येष्ठ नेते प्रा.एस.व्ही.जाधव, पुरोगामी महिला संघटनेच्या अध्यक्ष आशा शिंदे, मुंबई कार्यालयीन चिटणीस अॅड.राजेंद्र कोरडे, जिल्हा चिटणीस रामदास जराते यांच्या उपस्थितीत आज दुपारी १२ वाजता हॉटेल लेक व्ह्यू येथे पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीस प्रारंभ झाला. यावेळी मंचावर बाबासाहेब देशमुख, अॅड.राहुल देशमुख, बाबासाहेब कारंडे, काकासाहेब शिंदे उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला संविधान दिनानिमित्त साम्या कोरडे हिने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन सर्वांना शपथ दिली. त्यानंतर अॅड.राजेंद्र कोरडे यांनी दोन दिवसीय बैठकीची रुपरेषा सांगितली. सुरुवातीला रामदास जराते यांनी स्वागतपर भाषण करुन नक्षलविषयक भ्रम दूर करणे हाही एक मध्यवर्ती समितीची बैठक गडचिरोलीत घेण्याचा हेतू असल्याचे सांगितले. जिल्ह्यात आता प्रबोधन होऊ लागल्याने आदिवासीदेखील कायदा समजून घेऊ लागले आहेत. हा सकारात्मक बदल असल्याचे ते म्हणाले.

 प्रा.एस.व्ही.जाधव यांनी ‘शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा’, असा पहिला ठराव मांडला. बीड येथील विष्णूपंत घोलप यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.

यावेळी प्रा.जाधव यांनी शेतीसंदर्भात अभ्यासपूर्ण विवेचन केले. गेल्या ७० वर्षांत शेतमालाचे उत्पादन ५० लाख टनांहून ३१५ लाख टनापर्यंत पोहचलं. मात्र, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही. आजवरच्या सरकारांनी व्यापक शेतीधोरण राबविलं नाही, ही बाब त्यासाठी कारणीभूत असल्याची टीका प्रा.जाधव यांनी केली. मोदी सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार शेतमाला हमीभाव देऊ शकत नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिलं. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्याही मोडीत काढल्या. कंत्राटी शेतीचा कायदा करुन गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी अंबानी, अदानीच्या घशात टाकण्याचा डाव आखला, अशी टीका प्रा.जाधव यांनी केली.

महिला संरक्षण व सक्षमीकरण या विषयावर पुरोगामी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष आशा शिंदे यांनी दुसरा ठराव मांडला. कोल्हापूरच्या नेत्रदीपा पाटील यांनी यांनी त्याला अनुमोदन दिले. महिलांवरील अन्याय, अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कठोर कायदेशिर कारवाई करावी, महिलांना स्वयंरोजगाराची व त्यांच्या सुरक्षेविषयी खास मोहीम राबवावी, दुर्बल घटकांतील महिलांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी खास उपाययोजना राबवावी इत्यादी मागण्या आशा शिंदे यांनी केल्या.

तिसरा ठराव आ.श्यामसुंदर शिंदे यांनी मांडला. गायरान जमिनीविषयीचा हा ठराव होता. रामदास जराते यांनी ५ व्या अनुसूचीतील अधिकारांची अंमलबजावणी करण्याविषयी चौथा ठराव सादर केला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शंभर टक्के भरपाई द्या, असा पाचवा ठराव पुरोगामी युवक संघटनेचे राज्याध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांनी मांडला. बाळासाहेब देशमुख यांनी त्यास अनुमोदन दिले.

या बैठकीला मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, कोकण अशा विविध भागांतील दीडेशहून अधिक प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत.

पुरोगामी नेत्यांना श्रद्धांजली

सांगोला येथे झालेल्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीनंतर निधन झालेल्या शेकाप व अन्य पुरोगामी पक्षांच्या नेत्यांच्या दुखवट्याचा ठराव आ.जयंत पाटील यांनी मांडला. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील, माजी आमदार किसनराव देशमुख, कांतीलाल शिंदे, बाळासाहेब चव्हाण, कम्युनिस्ट नेते कुमार शिराळकर, समाजवादी नेते संजीव साने यांना श्रद्धांजली वाहून आ.पाटील यांनी दिवंगत नेत्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला.

रविवारी बैठक आणि जाहीर सभा

रविवारी(ता.२७) सकाळी ९ वाजता बैठक सुरु होणार असून, आणखी काही ठराव मांडण्यात येतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौकात जाहीर सभा होणार आहे. या बैठकीला आ.जयंत पाटील, आ.शिंदे आणि अन्य नेते संबोधित करणार आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KG4V1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना