/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२७: पेसा आणि ग्रामसंभाविषयक कायदे पायदळी तुडवून सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. हे बेकायदेशिर असून, त्याविरोधात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी सांगितले.
शेकापतर्फे गडचिरोली येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पक्षाचे नेते प्रा.एस.व्ही.जाधव, अॅड.राजेंद्र कोरडे, जिल्हा चिटणीस रामदास जराते, जयश्री वेळदा, जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, युवक आघाडीचे जिल्हाप्रमुख अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, सावित्री गेडाम, दर्शना भोपये, माकपचे जिल्हा चिटणीस अमोल मारकवार यावेळी उपस्थित होते.
आ.जयंत पाटील पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती विपूल प्रमाणात आहे. त्यावरच आदिवासींची उपजीविका चालते. परंतु भांडवलदारांमार्फत लोहखनिज उत्खनन करुन आदिवासींचा रोजगार हिरावला जात आहे, त्यासाठी पेसा कायदा आणि ग्रामसभांचे अधिकार नाकारले जात आहेत. प्रशासन आणि पोलिस नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असून, पर्यावरणविषयक जनसुनावणीही दडपशाहीने करण्यात आली. याविरोधात आपण अधिवेशनात आवाज उठविणार असून, वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाऊ, असे आ.पाटील म्हणाले.
जिल्ह्यात आदिवासींच्या साधनसंपत्तीची लूटमार केली जात आहे. अधिकारी तस्करांना पाठीशी घालत आहेत, हे खपवून घेणार नाही, असा इशारा देत आ.पाटील यांनी रेती तस्करांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी केली.
पेसा कायद्यामुळे आदिवासींना संरक्षण मिळालं आहे. परंतु ओबीसींवर वारंवार अन्याय केला जात आहे. केंद्र आणि राज्य शासन ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यास वेळकाढू धोरण अवलंबित आहे. हे आरक्षण मिळवून देऊन ओबीसींना राजकीय संरक्षण देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी असल्याचे आ.जयंत पाटील म्हणाले. मच्छिमार समाजाला मासेमारी करण्यासाठी विविध योजना राबवून त्यांना भरघोस सबसिडी देण्याची मागणीही त्यांनी केली.
मेडिगड्डा धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील १२ गावांतील नागरिक उपोषणाला बसले आहेत. बाधित शेतकऱ्यांची जमीन संपादित करताना त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी शेकापची भूमिका असून, त्यासंदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करु, शिवाय तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशीही स्वत: बोलू, असे आ.पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अमोल मारकवार, तर प्रास्ताविक रामदास जराते यांनी केले.