/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१४: ठार मारण्याची धमकी देऊन एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकास जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावास व २६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दीपक एकनाथ कुमरे(२४), रा.बोरीचक, ता.आरमोरी असे दोषी युवकाचे नाव आहे.
हकीकत अशी की, १ ऑक्टोबर २०१९ रोजी ३० वर्षीय पीडित महिला, तिची सासू आणि अन्य चार महिला पिसेवडधा येथील मातोश्री शाळेच्या कामावर मजुरी करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी १ वाजताच्या सुमारास आरोपी दीपक कुमरे याने तेथे जाऊन ‘गावाबाहेर १९ जण थांबलेले असून, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची आहे’, असे सांगून पीडित महिलेला घरी नेले. पीडित महिलेने एका महिलेलाही सोबत नेले होते. मात्र, घरी जाताच आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला. ती ओरडताच गावकरी मदतीला धावले. त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी दीपक कुमरे यास भादंवि कलम ३०७, ३०५, ३५४(अ),(ब),३४१,४४८,५०६ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अंजली राजपूत यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व न्यायालयाने फिर्यादी व इतर साक्षदारांचे बयाण आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी दीपक कुमरे यास ३ वर्षांचा व २६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पीडितेला २० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.