शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली: ‘सावकारा’ च्या घरावर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची धाड

Monday, 9th January 2023 07:26:08 AM

गडचिरोली,ता.९: अवैध सावकारी करणाऱ्या गडचिरोली शहरातील गांधी वॉर्डातील रहिवासी मनोज नेवलकर यांच्या घरावर सहकार व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या सकाळी धाड टाकून नियमबाहयरित्या चालणाऱ्या सावकारी व्यवहाराची कागदपत्रे जप्त केली.

मनोज मुरलीधर नेवलकर व त्यांची पत्नी मीना मनोज नेवलकर हे दाम्पत्य बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करीत असल्याची माहिती सहकार विभागाला मिळाली होती.शिवाय गडचिरोली पोलिस ठाणे आणि अन्य ५ व्यक्तींनीही ७ डिसेंबरला तक्रार केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) तथा सावकारांचे निबंधक प्रशांत धोटे यांच्या आदेशान्वये सहायक निबंधक (सहकारी संस्था) हेमंत सौलाखे व सहायक निबंधक (प्रशासन) संजीव देवरे यांनी त्यांच्या पथकासह नेवलकर दाम्पत्याच्या घरी धाड टाकली.

यावेळी त्यांच्या घरी ३ कोरे स्टॅम्प पेपर, ४ कोरे धनादेश, २ रेव्हेन्यू तिकीट लावलेल्या पावत्या, रकमेच्या नोंदी असलेल्या ३० चिठ्ठया, ३ रजिस्टरची पाने, १० हिशोबाच्या नोंदवहया, १० बँक पासबूक, अनेक व्यक्तीच्या नावाने असलेल्या मतदान कार्ड,पॅनकार्ड व आधार कार्डांच्या ६५ छायांकित प्रती, विक्रीपत्र, मालमत्तापत्र इत्यादी आक्षेपार्ह आढळून आली. ही कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली असून नेवलकर दाम्पत्याविरुध्द सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सहायक निबंधक हेमंत सौलाखे यांनी सांगितले.

कारवाई पथकात सहकार विभागातर्फे कुरखेड्याचे सहकार अधिकारी सुशील वानखेडे, विजय पाटील, शैलेंद्र खांडरे,हेमंत जाधव, ऋषिश्वर बोरकर, शालिकराम सोरते, शांताराम कन्नमवार, शैलेश वैद्य, तुषार सोनुले, प्रशांत प्रेमलवार, अनिता हुकरे, श्रीमती धारा कोवे, तर पोलिस विभागातर्फे  पोलिस उपनिरीक्षक दीपक कुंभारे, पोलिस शिपाई सुनील पुठ्ठावार,वत्सला वालदे यांचा सहभाग होता.

या कारवाईत गडचिरोलीच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे गटसचिव रमेश कोलते व खरपुंडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे गट सचिव घनश्याम भुसारी यांनी पंच म्हणून काम पाहिले.

दरम्यान, कुणी बेकायदेशीरित्या सावकारी करीत असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरेाली तसेच तालुका सहायक निबंधक,सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी केले आहे.



तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
489OE
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना