/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.४: लग्न करण्याचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या युवकास गडचिरोली येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेसह १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रदीप बालसिंग हारामी, रा.ढोलडोंगरी,(ह.मु.अंतरगाव) ता.कोरची असे दोषी युवकाचे नाव आहे.
घटनेची हकीकत अशी की, २० वर्षीय् मृत तरुणी पुणे येथे नोकरी करीत होती. तिच्या गावानजीकच्या कोटगूल येथे मंडई असल्याने ती पुण्याहून आपल्या गावाकडे येण्यास निघाली होती. ३१ जानेवारी २०१८ रोजी ती देसाईगंज येथे पोहचताच प्रदीप हारामी त्या तरुणीला कुरखेडा तालुक्यातील डिप्राटोला-तळेगाव मार्गावर घेऊन गेला. तेथे प्रदीपने तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यावेळी तिने प्रदीपकडे लवकरात लवकर लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र, प्रदीपचे आधीच महाविद्यालयातील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याने तो लग्नास नकार देऊ लागला. काही वेळातच त्याने त्या तरुणीचा गळा दाबला. त्यानंतर ब्लेडने गळा चिरुन तिची हत्या केली.
२ फेब्रुवारी २०१८ रोजी डिप्राटोला-तळेगाव रस्त्याच्या कडेला एका युवतीचा मृतदेह असल्याची माहिती तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक कृष्णा सहारे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी तिच्याकडे ट्रॅव्हल्सचे तिकिट आढळले. त्यावर एक मोबाईल क्रमांक लिहिलेला होता. त्या मोबाईलचा डीसीआर काढल्यानंतर तो एका युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्या युवकास विचारणा करताच त्याने मोबाईल प्रदीप हारामी यास दिल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी प्रदीपला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१८ ला पोलिसांनी आरोपी प्रदीप हारामी यास अटक केली.
पुढे सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर अपर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज या खटल्याचा निकाल लागला. अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने फिर्यादी व इतर साक्षदारांचे बयाण नोंदूवन, सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आणि परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेऊन आरोपी प्रदीप बालसिंग हारामी यास भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मात्र, कलम ३७६(१) मध्ये त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान काम पाहिले.