/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१६: जेसीबी व पोकलेनच्या साह्याने आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी येथील नदीघाटातून अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या १६ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.
मागील अनेक दिवसांपासून विविध ठिकाणच्या रेती घाटांमधून रेती तस्करी होत आहे. मात्र, महसुल विभागाचे अधिकारी कुठलीच कारवाई करीत नसल्याने रेती तस्करांची हिंमत वाढली होती. अशातच आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी येथील खोब्रागडी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा आणि वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर १४ मार्चच्या रात्री पोलिस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, उपनिरीक्षक दीपक कुंभारे, राहुल आव्हाड आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता काही जण जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने रेती उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले. तेथे मोठे ट्रक आणि टिप्परही होते. पोलिसांनी घटनास्थळावरुन ३ कोटी ३० लाख ४० हजारांची वाहने व अन्य साहित्य जप्त केले. शिवाय १६ जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
निखिल शंकरराव भुरे,रा.वाठोडा (नागपूर),राहुल बाजीराव घोरमोडे,रा.बेटाळा,(ब्रम्हपुरी),सोनल नानाजी उईके,रा.डोंगरतमाशी, (आरमोरी), धनंजय यशवंत मडावी,डोंगरतमाशी,(आरमोरी),यशवंत महादेव मडकाम,रा.कुरंडीमाल, (आरमोरी),नीतेश उमेश मालोदे,निलज(पवनी),अफसर अन्वर शेख,रा.भिवापूर(नागपूर),अब्दुल राजीक मोहम्मद इस्माईल,कलीम कॉलनी (अमरावती),अताउल्ला खाँ रियाज उल्ला खान, रा.लालखडी (अमरावती), नरेश तुकाराम ढोक,रा.भिवापूर (नागपूर),नासीर शेख,रा.बिडगाव,(कामठी), संतोष पवार, रा.तळेगाव ठाकूर,ता.तिवसा(अमरावती),शेख वसीम शेख जलील,रा.मंगरुळ दस्तगिर(अमरावती), निखिल गोपाल सहारे,रा.विरली,(लाखांदूर),जावेद अमीर खान, पांढुरणा(नागपूर), श्याम मन्साराम चौधरी रा.कोर्धा, (नागभिड) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींमध्ये बहुतांश जण हे गडचिरोली जिल्ह्याबाहेरील आहेत. रेती तस्करांवर पोलिसांनी केलेली अलीकडच्या काळातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
घरकुलाची रेती विकली जाते कंत्राटदारांना
घरकुल बांधकामासाठी ५ ब्रास रेती मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु रेती वाहतूकदार अनेक घरकुलधारकांना रेती न देता कंत्राटदार आणि अन्य व्यक्तींना साडेतीन हजार रुपये प्रतिब्रास याप्रमाणे विकून मोठी कमाई करीत आहेत. काहींनी आधीच रेतीचा साठा करुन ठेवला असून, शेतातील रेती म्हणून या रेतीची विक्री केली जात आहे. मात्र, महसुल प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या त्या फोटोची आठवण
दोन वर्षांपूर्वी गडचिरोली येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा रेती तस्करासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. तस्कराने महागडी गाडी गिफ्ट दिल्यानंतर आपल्या बंगल्यावर त्या अधिकाऱ्याने रेती तस्कर, एक दलाल आणि वाहनचालकासमवेत फोटो काढला होता. अधिकारी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात, हे त्या फोटोतून स्पष्ट झाले होते. रेती तस्करी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर, त्या फोटोची चर्चा होऊ लागली आहे.
.