/* */
सोमवार, 29 मे 2023
लक्षवेधी :
  गण्यारपवार मारहाण प्रकरण: गावात येऊन बयाण घेण्याची साक्षदारांची मागणी             थेट बंगल्यावर जाऊन न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे निलंबित             चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे प्रथमवर्ग न्यायालयाचे आदेश             चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाट्यपुस्तकाचे २८ ला प्रकाशन              गडचिरोली जिल्ह्यातील तीन एसडीपीओंच्या बदल्या, पिपंरी चिंचवडचे सहआयुक्त प्रशांत अमृतकर गडचिरोलीचे नवे एसडीपीओ           

बनावट प्रमाणपत्र जोडून पोलिसाची नोकरी बळकावणाऱ्या पाच जणांना अटक

Sunday, 23rd April 2023 06:58:54 AM

गडचिरोली,ता.२३: जिल्ह्यात यापूर्वी व नुकत्याच झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत बीड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असून, या घटनेमुळे खळबळ माजली आहे.. 

यंदा एप्रिल महिन्यात पोलिस विभागाने पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यात पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. परंतु काही जणांनी बीड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडल्याचे गोपनीय पत्र पोलिस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांच्याकडे प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने श्री.नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी व उपनिरीक्षक दीपक कुंभारे यांच्या नेतृत्वात दोन तपास पथके तयार केली. या पथकाने दस्तऐवजांची बारकाईने तपासणी केली असता, मागील पोलिस भरतीत प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर करून शिपाई म्हणून नियुक्त झालेल्या ५ पैकी २ जणांचे, तर यंदाच्या भरतीत तात्पुरती नियुक्ती झालेल्या ४ उमेदवारांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले. शिवाय निवड झालेल्या उमेदवारांची बीड जिल्ह्यात कुठलीही स्थावर मालमत्ता नसताना आणि ती शासनाने कुठल्याही प्रकल्पासाठी संपादित केली नसताना संबंधित उमेदवारांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले.  

त्यामुळे पोलिसांनी पाच युवकांना अटक केली, तर एक जण फरार आहे. हे सर्व उमेदवार गडचिरोली जिल्ह्यातील असल्याचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी सांगितले. या भरतीत आणखी काही उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्र जोडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. 

ही कारवाई पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, उपनिरीक्षक दीपक कुंभारे, राहुल आव्हाड, पुरुषोत्तम वाडगुरे, नरेश सहारा, हेमंत गेडाम, सतीश कत्तीवार, राकेश सोनटक्के, दीपक लेनगुरे, अकबर पोयाम, शुक्रचारी गव ई, माणिक दुधबळे, सुनील पुठ्ठावार, मंगेश राऊत, सचिन घुबडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, सुरेश वट्टी, प्रशांत गरफडे, पंकज भगत, लीला सिडाम, शेवंता दाजगाये, पुष्पा कन्नाके, सोनम जांभुळकर, शगीर शेख, मनोहर दोगरवार यांनी केली. 

रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता

प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करण्यास गडचिरोली येथील एका इसमाने उमेदवारांना मदत केल्याची माहिती आहे. शिवाय या प्रकरणात रॅकेट सक्रिय असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. पोलिस भरतीशिवाय अन्य भरतीमध्येही अशाप्रकारचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन नोकऱ्या बळकावल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिशेनेही तपास झाल्यास मोठा भंडाफोड होऊ शकतो.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
J5VD6
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना