/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१०: वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करणाऱ्या पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शामराव ऋषी शेडे(३८), रा.मुडझा, असे दोषी इसमाचे नाव आहे.
१५ वर्षांपूर्वी शामराव शेंडे याचा विवाह निरंजना नामक युवतीशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर तीन-चार वर्षातच शामरावला दारुचे व्यसन लागले. तेव्हापासून तो पत्नी निरंजना हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करु लागला. त्यामुळे निरंजना ही कंटाळून आपल्या मुलांसह आई-वडिलांकडे राहायला गेली. दोन वर्षांनंतर शामराव तिच्या माहेरी गेला आणि यापुढे मी निरंजनाला त्रास देणार नाही, असे सांगून तिला आपल्या घरी घेऊन गेला. काही दिवसांतच पुन्हा दोघांमध्ये वाद सुरु झाला. याबाबत शामरावला समजावूनही सांगण्यात आले. परंतु त्याच्या वर्तनात काहीच सुधारणा झाली नाही.
अशातच २९ सप्टेंबर २०२० च्या रात्री शामरावने दारु पिऊन निरंजनाच्या डोक्यावर कु-हाडीने जोरदार प्रहार केला. यात ती गंभीर जखमी झाली. माहिती मिळताच निरंजनाचे वडील तिच्या घरी पोहचले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर वडिलांनी जावई शामराव शेंडे हा माझी मुलगी निरंजना हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होता. त्यातूनच त्याने निरंजनाची हत्या केली, अशी फिर्याद गडचिरोली पोलिस ठाण्यात केली. यावरुन पोलिसांनी आरोपी शामराव शेंडे याच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढे तत्कालिन पोलिस निरीक्षक प्रदीप चौगावकर व सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
काल (ता.९) या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने फिर्यादी व साक्षदारांचे बयाण आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी शामराव शेंडे यास जन्मठेप व १० हजार रुपयांची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे व एन.एम.भांडेकर यांनी काम पाहिले.