/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१६: डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेतून खरेदी करावयाचे शेतीपयोगी साहित्य चक्क डबल किमतीत खरेदी करण्याचा अट्टाहास गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक कार्यालयाने धरला असून, यातून मोठा भ्रष्टाचार करण्याचा डाव असल्याचा आरोप सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे यांनी काल(ता.१५) पत्रकार परिषदेत केला.
योगाजी कुडवे यांनी सांगितले की, विशेषत: वाघाची दहशत असलेल्या पोटेगाव, गडचिरोली व चातगाव या तीन वनपरिक्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्याची खरेदी करण्यासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना प्रत्येकी २५ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला. काही समित्यांना तो अद्याप प्राप्त व्हायचा आहे. जे साहित्य खरेदी करावयाचे आहे, ते या समित्यांमार्फत खरेदी करणे अपेक्षित आहे. परंतु गडचिरोलीच्या उपवनसंरक्षकांनी या समित्यांना कोटेशन पाठवून चंद्रपूरच्या पुरवठाधारकांची नावेही पत्राद्वारे सांगितली आहेत. या पुरवठाधारकांचे दर इतरांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्याकडूनच खरेदी करावी, असे पत्रात म्हटले आहे. परंतु उपवनसरंक्षकांचया पत्रात नमूद केलेल्या पुरवठाधारकांच्या दरापेक्षा संबंधित वस्तूंचे बाजारमूल्य अर्धे आहे. असे असताना उपवनसंरक्षक कार्यालयाचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न योगाजी कुडवे यांनी विचारला आहे.
बाजारात १ लाख ३५ हजार रुपयांत मिळणाऱे रोटावेटर २ लाख ३५ रुपयांत खरेदी करण्यास उपवनसंरक्षक कार्यालयाने सांगितले आहे. शिवाय ७५ हजारांचे पेरणी यंत्र दोन लाख २५ हजार रुपयांत, २ लाख ५० हजार रुपयांचे थ्रेशर मशिन ४ लाख ८० हजारांत, १ लाख ५० हजारांची ई रिक्षा ४ लाखं २५ हजार रुपयांत, तर २ हजार रुपयास मिळणारे पाणी गरम करण्याचे यंत्र १३ हजार रुपयांना खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे. एवढी प्रचंड तफावत कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करुन योगाजी कुडवे यांनी संबंधित कार्यालयाचा हेतू चांगला नसून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वनसंरक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.
पत्रकार परिषदेला नीळकंठ संदोकर, रवींद्र सेलोटे व आकाश मट्टामी उपस्थित होते.