/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२०: जिल्हा नियोजन समितीत निमंत्रित सदस्यांच्या झालेल्या नियुक्त्यांवरुन भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये बिनसले असून, भविष्यात हा वाद मुख्यमंत्री विरुद्ध पालकमंत्री असे स्वरुप घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
१८ मे रोजी नियोजन विभागाने गडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर ११ जणांची नियुक्ती जाहीर केली. त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, बाबूराव कोहळे, प्रकाश पोरेड्डीवार, रवींद्र ओल्लालवार, प्रशांत वाघरे, गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, योगिता भांडेकर, कलाम पीर मोहम्मद, सदानंद कुथे व सुनील बिस्वास यांचा समावेश आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याचा त्यात समावेश करण्यात आला नाही. या संदर्भात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निषेध केला.
हेमंत जंबेवार म्हणाले की, भाजप सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला प्रतिनिधीत्व देताना डावलत आहे. मागील वेळी गोंडवाना विद्यापीठाच्या नामनिर्देशित सिनेट सदस्यांच्या नियुक्त्यांच्या वेळी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातर्फे २ नावे पाठविण्यात आली होती. परंतु तेव्हाही भाजपने आमची नावे येऊ न देता पक्षाला डावलले होते. आता जिल्हा नियोजन समितीवर ११ जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यात आमच्या एकाही कार्यकर्त्याचा समावेश नाही. वास्तविक नियुक्त्या करताना ६०-४० असा फॉर्म्युला असताना एकाही जणाची नियुक्ती न झाल्याने आम्ही या बाबीचा निषेध करतो, असे जंबेवार म्हणाले. हा विषय आम्ही पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयाला आणि जिल्हा संपर्कप्रमुखांना अवगत केल्याची माहिती जंबेवार यांनी दिली.
आमचा पक्ष नवीन असला; तरी ग्रामपंचायत व नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमचे उमेदवार निवडून आले आहेत. तरीही भाजपचे आमची ताकद ओळखली नसेल, तर आगामी निवडणुकांमध्ये आम्ही आमची ताकद भाजपला दाखवून देऊ, असा इशारा जंबेवार यांनी दिला. पत्रकार परिषदेला जिल्हा महिला आघाडीप्रमुख अमिता मडावी, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वरगंटीवार, बाळू उंदिरवाडे, जिल्हा सचिव दिलीप गोवर्धन, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक भारसाकडे, तालुकाप्रमुख वसंत गावतुरे, वाहतूक कामगार सेना जिल्हाप्रमुख चांगदास मसराम, महिला आघाडीच्या शहर सचिव गीता बोबाटे, आदिवासी सेलप्रमुख नीळकंठ येरमे, प्रतिभा धाईत उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांवर मात
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता शिंदे गटाची भाजपशी युती असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु नियोजन समितीच्या नियुक्त्यांवरुन उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर मात केल्याचे चित्र दिसत आहे.
त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना भेटायला हवे होते: किशन नागदेवे
शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख हेमंत जंबेवार यांच्या नाराजीबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, शिवसैनिकांची नावे नियोजन समितीत यायला हवीत अशी आमचीही इच्छा आहे. परंतु त्यासाठी रास्त मार्गाचा वापर होणे आवश्यक आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रितसर पत्र दिले असते, तर त्यांचीही नावे निश्चितच आली असती. उगीचच गैरसमज करुन घेता कामा नये, असेही श्री.नागदेवे म्हणाले.