/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२०: सुरजागड पहाडावरील खाणीतून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत वासुदेव कुळमेथे (४९) नामक शिक्षक ठार झाले. ही घटना आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आलापल्ली येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर घडली.
मूळचे मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील रहिवासी असलेले वासुदेव कुळमेथे हे काटेपल्ली येथील भगवंतराव आश्रमशाळेत शिक्षक होते. आज दुपारी ते आलापल्ली येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोरुन मोटारसायकलने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. अपघात वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावरुन लोहखनिज वाहतूक करणारे शेकडो ट्रक आलापल्लीमार्गे दररोज धावत असतात. या वाहनांनी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, वारंवार होणाऱ्या अपघांतांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. १४ मे रोजी आष्टी येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे १२ वर्षीय मुलगी ठार झाली होती, त्यानंतर सहा दिवसांतील आजची ही दुसरी घटना आहे.