मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

चुडाराम बल्हारपुरे यांच्या नाट्यपुस्तकाचे २८ ला प्रकाशन

Wednesday, 24th May 2023 02:21:59 AM

गडचिरोली,ता.२४: झाडीपट्टी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी लिहिलेल्या ‘गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाट्यपुस्तकाचे प्रकाशन २८ मे रोजी झाडीपट्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते होणार आहे.

गडचिरोली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास निंबोरकर यांच्या आरमोरी मार्गावरील निवासस्थानी प्रकाशन समारंभ होणार आहे. पुणे येथील मधुश्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य समीक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम हे पुस्तकावर भाष्य, तर प्रा. डॉ. राज मुसने हे नाट्य समीक्षण करणार आहेत.

विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्रा. डॉ. एस.एन.पठाण, प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रा. डॉ. धनराज खानोरकर, प्रा. सदानंद बोरकर, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा.डॉ.शेखर डोंगरे, प्रा.श्रीकांत कुत्त्‍रमारे, प्रसिद्ध नाट्यकलावंत व गायक अनिरुध्द वनकर, प्रा. डॉ. नरेश मडावी, प्रा. डॉ. माधव कांडणगिरे, प्रा. योगीराज नगराळे, प्रा. डॉ. सविता सादमवार व प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक कुसुम आलाम उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी झाडीपट्टीतील संगीतकार विठ्ठल खानोरकर हे क्रांतिवीर बाबूराव शेडमाके या नाटकातील नाट्यगिते सादर करणार आहेत.

यानिमित्त झाडीपट्टीतील निवडक कवींचे कविसंमेलनही घेण्यात येणार आहे.या कार्यक्रमास कवी, साहित्यिक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन‘नाट्यश्री’ संस्थेचे दादा सुंदरकर, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे, योगेश गोहणे, प्रा. अरुण बुरे व कुंदा बल्हारपुरे यांनी केले आहे.

चुडाराम बल्हारपुरे यांची नाट्यसंपदा

चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कारप्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार देऊन गौरविले आहे. शिवाय अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. आजपर्यंत त्यांची ११ पुस्तके प्रकाशित झाली असून बाबूराव शेडमाकेंवरील हे त्यांचे बारावे पुस्तक आहे. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, बहुढंगी समाधीवाले बाबा व धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

कंथेवाडी येथे नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात त्यांच्या‘ गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाटकास राज्यस्तरीय प्रेरणा साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
N18O4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना