/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१५: कुरखेडा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेनेच्या शहरप्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने मध्यरात्री चाकू भोसकून हत्या केल्याने खळबळ माजली आहे. राहत सय्यद(३२) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेचा पती तायमिन शेख यास पोलिसांनी अटक केली आहे.
राहत सय्यद या शिवसेनेच्या युवती सेनेच्या शहरप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. तायमिन शेख याच्याशी लग्न झाल्यानंतर दोघेही राहतच्या कुरखेडा येथील माहेरी वास्तव्य करीत होते. आज पहाटे राहतचे वडील झोपेतून उठल्यानंतर त्यांना राहतचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. मध्यरात्री तायमिन शेख याने भाजी कापण्याच्या चाकूने राहतला भोसकले. त्यानंतर पुन्हा सत्तूरने तिच्यावर वार केले. यात तिचा मृत्यू झाला. राहतची हत्या केल्यानंतर तायमिन शेख याने सती नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. त्यानंतर त्याने थेट पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांपुढै आत्मसमर्पण केले.
तायमिन शेख हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये हरिणाची शिंगे विकल्याप्रकरणी त्याला तेथील पोलिसांनी अटक केली होती. ५ महिन्यांची शिक्षा भोगून १५ दिवसांपूर्वीच तो जामीनावर सुटून आला होता. तत्पूर्वी तो मुंबईत फूटपाथवर साहित्य विक्रीचे काम करीत होता. आज त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. हत्येचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिस करीत आहेत. राहत सय्यद यांचे वडील अज्जू सय्यद हे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मृत राहतला दोन आई, वडील आणि दोन मुले आहेत. या घटनेने कुरखेड्यात खळबळ माजली आहे.