गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

सिरोंचा येथील बतकम्मा उत्सव

Tuesday, 22nd July 2014 09:59:58 AM

भारत देशात विविध जाती, धर्माचे लोक राहतात. प्रत्येक प्रांतातील जाती वेगळ्या, त्यांची भाषा, रितीरिवाज, परंपरा आणि उत्सवही वेगळे़ पण, यामधून भारतीय नागरिकांनी नेहमीच सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले आहे. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील नागरिकही असेच उत्सवप्रिय आहेत. प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नदीच्या प्रीतीसंगमावर वसलेल्या या सिरोंचा तालुक्यातील बहुतांश नागरिकांचा रोटी-बेटी व दैनंदिन व्यवहार आंध्रप्रदेशाशीच चालतो. कारण गडचिरोली हे जिल्ह्याचे मुख्यालय सिरोंचापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तेथील नागरिक शासकीय किंवा शैक्षणिक कामकाजासाठीच गडचिरोलीला येतात. अन्य व्यवहार मात्र आंध्रप्रदेशाशीच होतात. कारण नदी ओलांडली की, आंध्रप्रदेश लागतो. त्यामुळे तेथील भाषा, संस्कृती आणि व्यवहाराची छाप सिरोंचा तालुक्यातील नागरिकांवर पडली आहे. बरेच नागरिक रोजगार वा अन्य कारणांसाठी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे स्थानांतरीत होऊन स्थायी झाले आहेत. त्यामुळे आंध्रप्रदेशाप्रमाणेच सिरोंचा येथील बहुतांश नागरिक तेलगू भाषिक आहेत. अनेक वर्षांपासून सिरोंचात वास्तव्य करणारा मराठी माणूसही तेलगू भाषा बोलतो.

अशा या तेलगू भाषिक राज्यात 'बतकम्मा'उत्सव आनंदाने साजरा केला जातो. दसऱ्याच्या नऊ दिवसांपूर्वी बतकम्मा देवीची स्थापना केली जाते. दाक्षिणात्य साज-बाज असलेल्या उत्सवात सुवासिनी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. परडी किंवा धातूच्या मोठ्या परातीत विविधरंगी फुलांची क्रमवार व गोलाकार रचना महिला सुंदर लंबाकृती मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या मध्यभागी कोहळा किंवा भोपळ्याच्या फुलातील गर्द पिवळ्या पुंकेसराची 'गौरीदेवी'(गौरम्मा) म्हणून प्रतिष्ठापना करतात. त्यानंतर दीपज्योती लावलेले निरांजन गौरीपुढे ठेवून तिची मनोभावे पूजा-अर्चा करतात. त्यानंतर प्रत्येक वॉर्डातील विशिष्ट ठिकाणी नटून-थटून आलेल्या महिला बतकम्मा आणतात. तिच्या सभोवताल फेर धरून टाळ्या वाजवीत देवीच्या गुणवर्णनपर धामिर्क गाणी गातात. एक महिला गाण्यास सुरवात करते आणि अन्य महिला कोरसमध्ये गातात. ही गिते तेलगू भाषेत असतात. हा उत्सव सतत नऊ दिवस चालतो. विजयादशमीच्या संध्याकाळी गावात प्रतिष्ठापना केलेल्या सर्व बतकम्मा प्राणहिता नदीच्या काठावर विठ्ठलेश्वर मंदिरालगतच्या पटांगणावर एकत्र आणतात. तेथेही देवीची गुणवर्णपर गिते बराच वेळ गायिली जातात. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून देवीचे विसर्जन केले जाते. बतकम्मा देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी पुरुष मंडळी पुढाकार घेऊन फुले गोळा करण्याचे काम करतात.

 

बतकम्मा?

बतकम्मा शब्दाची उत्पत्ती 'बतकू'या ग्रामीण तेलगू शब्दापासून झाल्याचे सांगण्यात येते. बतकूचा शुद्ध उच्चार 'ब्रतकू' असा आहे. 'ब्रतकू'चा अपभ्रंश होऊन बतकू शब्द तयार झाला आहे. ब्रतकू म्हणजे जीवन किंवा आयुष्य़ याचा अर्थ बतकम्मा म्हणजे जीवनदायीनी. आपल्या कुटुंबीयांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी देवीला साकडे घालण्याचा उत्सव म्हणजे बतकम्मा उत्सव.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
N5AWX
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना