शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोलीत शाळा आणि कोचींग कलासेसचे साटेलोटे, पालकांची लूट

Tuesday, 16th June 2015 12:59:53 AM

 

गडचिरोली, ता.१६: येथील काही माध्यमिक शाळांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रमुख आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांचे साटेलोटे असून, दोघेही मिळून विद्यार्थ्यांची प्रचंड लूट करीत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. कोचिंग क्लासेसचे संचालक विद्यार्थ्यांना पावती देत नसल्याने आयकर विभागाने अशा क्लासेसवर कठोर कारवाई करावी व पालकांनी अशा शाळा व कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून गडचिरोलीत कोचिंग क्लासेसचे पीक आले आहे. या क्लासेसचे संचालक विविध आमिषे दाखवून विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करीत असतात. शिवाय दहावी व बारावीचा निकाल लागल्यावर स्वत:च संबंधित गुणवंत विद्यार्थ्यास एखाद्या मोठया अधिकाऱ्याकडे नेऊन आपली पाठ थोपटून घेतात. त्यानंतर हे फोटो वर्तमानपत्रात देऊन आपली प्रसिद्धी करवून घेतात. यामुळे विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षित होतात. प्रत्यक्षात अनेक क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबले जाते. विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे शिकवलेही जात नाही. यावर कळस म्हणजे, काही कोचिंग क्लासेसवाले काही माध्यमिक शाळांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रमुखांशी साटेलोटे करुन विद्यार्थ्यांची प्रचंड लूट करीत आहेत. या महाविद्यालयांचे प्रमुख विद्यार्थ्यांना अमूक कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी लावा, असे बंधन लादतात, तर कोचिंग क्लासवालेही त्यांच्याकडे शिकवणी लावलेल्या विद्यार्थ्यांना अमूक महाविद्यालयातच तुम्ही प्रवेश घ्या, असे सांगतात. शहराबाहेरील एका मोठया व्यक्तीच्या शाळेची स्कूलबसच एका कोचिंग क्लासपुढे उभी असते. ही स्कूलबस विद्यार्थ्यांना ने-आण करीत असते.एकीकडे हे कनिष्ठ महाविद्यालय आपल्याकडे उत्तम व शिस्तबद्ध शिक्षण दिले जात असल्याचे सांगून विद्यार्थ्यांकडून प्रचंड पैसा वसूल करीत असते, तर दुसरीकडे आपल्याच विद्यार्थ्यांना खासगी कोचिंग क्लासेसमध्ये पाठवीत असते. या महाविद्याचा प्राचार्य शीघ्रकोपी म्हणून ओळखला जातो. यापूर्वी या प्राचार्याची एक-दोन प्रकरणेही वर्तमानपत्रांमधून चव्हाटयावर आली आहेत.

अन्य एका कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही याच कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. संबंधित कोचिंग क्लासच्या संचालकाने संस्थेच्या प्रमुखाशी जवळीक करुन आपले उखळ पांढरे करण्याचा धंदा चालविला आहे.

गडचिरोली शहराच्या मध्यवर्ती भागात एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात साधी पार्किंगलाही जागा नाही आणि तेथील शिक्षकांना अत्यल्प वेतन देऊन त्यांची बोळवण केली जाते. परंतु हे महाविद्यालय दरवर्षी आपले शुल्क वाढवीत असते आणि तेही भरमसाठ. या शाळेत असलेला एक शिक्षक एका कोचिंग क्लासमध्येही शिकवतो. इथेही तसेच आहे. बस्स. इथले विद्यार्थी तिथे आणि तिथले विद्यार्थी इथे. दोघेही मिळून पालक आणि विद्यार्थ्यांची लूट करीत आहेत. या शाळेत अकरावीत प्रवेश घेण्यासाठी ३० हजार रुपये विद्यार्थ्यांकडून वसूल केले जातात. बारावीची शिकवणी म्हणून तब्बल ८० ते ९० हजार रुपये अतिरिक्त वसूल केले जातात. त्यानंतर टक्केवारीने या रकमेची विल्हेवाट लावली जाते, अशी नागरिकांत चर्चा आहे. विशेष म्हणजे, कॉलेजच्या वेळातच अनेक विद्यार्थी कॉलेजबाहेर दिसून येतात. हे विद्यार्थी खासगी शिकवणीसाठी सोडले जातात. मागच्या वर्षी शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना तंबी देऊन हा प्रकार बंद केला होता, हे येथे उल्लेखनीय. एकंदरित शाळा-महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांचे साटेलोटे असल्याने शहरातील अशा महाविद्यालयाचे स्टँडर्ड काय असेल, याची पालकांना कल्पना येऊ शकते. 

गडचिरोली शहरातून दरवर्षी सुमारे ७०० ते ८०० विद्यार्थी बारावीची परीक्षा देतात. एका विषयासाठी साधारणत: १५ हजार रुपये घेतले जातात. ७०० ते ८०० विद्यार्थ्यांच्या शिकवणीचा विचार केल्यास दरवर्षी ३ ते ५ कोटींची उलाढाल कोचिंग क्लासेसमधून होते. परंतु कोचिंग क्लासेसचे संचालक विद्यार्थ्यांना पावती देत नाही. त्यामुळे हा सर्व पैसा संचालकांच्या घशात जातो. यासंदर्भात काही पालक आयकर विभागाकडे तक्रारी करणार असल्याची माहिती आहे. आयकर विभागाने कान टवकारल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RHZK9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना