/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिलांना हार्दिक शुभेच्छा. खरं तर छत्रपती शिवरायांना पराक्रमी बनविणारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानवंत बनविणारी आणि तमाम महापुरुषांना देशसेवेसाठी जन्म घालणारी महिलाच. सर्वप्रथम शाळा उघडून महिलांवर अनंत उपकार करणाऱ्या सावित्रीबाई फुले यादेखील महिलाच. या थोर महिलांच्या यादीत अहिल्याबाई होळकर, झांशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक महिलांचा समावेश होईल. त्यांच्याच कार्यामुळे आज महिला प्रगतीची अत्युच्च शिखरे पादाक्रांत करीत आहे. चूल आणि मूल या छोट्याशा परिघातून ती बाहेर येऊ लागली आहे. परंतु एकीकडे आजची महिला सर्वच क्षेत्रात पुढे जात असली, तरी ती अत्यंत भयग्रस्त वाटेवरुन जात असल्याचे दिसून येत आहे. स्त्री घराबाहेर पडली की, कुणाची वाईट नजर ती चुकवू शकत नाही. विनयभंग, बलात्काराचे प्रमाण वाढत आहेत. स्त्री भ्रूण हत्याही होत आहेत. मग, अशावेळी महिलांनीच महिलांच्या संरक्षणासाठी पुढे यायला हवे, असे मला वाटते.
घरकाम करणारी, अंगण खुलविणारी, लेकरांचा सांभाळ करुन त्यांना मोठं करणारी महिला, प्रसंगी हालअपेष्टा सहन करुन मुलाबाळांच्या सुखात आपलं सुख पाहणारी महिला आता अंतराळात जायला लागली आहे. अशा महिलांनाही प्रोत्साहन देण्याचे काम महिलांनी नाही तर मग कुणी करायचे?
महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. त्यांची अंमलबजावणी खरंच होतेय का, असाही प्रश्न कधी कधी सतावत असतो. कधी पतीकडून त्रास, तर कधी सासूचा जाच. न्याय मागायला गेले तर तो मिळेलच, याची शाश्वती नाही. अशा कठीण प्रसंगात महिला संघटनांची भूमिका महत्वाची असली पाहिजे. गरीब, होतकरु मुलींना सामाजिक भान म्हणून महिलांनी मदत करण्याची आवश्यकता आहे. दारुमुळे कुटुंबाची कशी वाताहत होते, हेही सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे दारुबंदीसाठीही महिलांनी आपले एक काम सोडून प्रयत्न करावे, असे माझे मत आहे. महिला ही काटकसर करणारी आहे. ती जर आपले कुटुंब व्यवस्थितरित्या सांभाळत असेल, तर ती देश का नाही सांभाळणार? अशी जाणीव ज्या थोड्या महिलांमध्ये निर्माण झाली आहे, त्या आता राजकारणातही येत आहेत. मात्र, आपण लोकप्रतिनिधी व्हायचे आणि कारभार मात्र नवऱ्याच्या मताने करायचा, असे होता कामा नये. लोकप्रतिनिधी महिला, मग त्या ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद वा विधानसभेतील असोत, त्यांनी स्वत: निर्णय घ्यायला हवे. असे झाले तरच महिला खऱ्या अर्थाने सक्षम होतील आणि महिला सक्षमीकरणाचा हेतू साध्य होईल. जागतिक महिला दिनी सर्व तरुणी व महिलांनी असा संकल्प करुया, एवढेच माझे नम्र आवाहन आहे.
गायत्री शर्मा
राष्ट्रीय उपाध्यक्ष
मानवाधिकार संघटना