बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

एनआरएचएम कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत मंत्र्यांचा एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

Thursday, 19th April 2018 06:36:26 AM

गडचिरोली, ता.१९: शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन आज नवव्या दिवशीही सुरुच असून, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आरोग्य मंत्री व वित्तमंत्री एकमेकांकडे बोट दाखवून वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचा आरोप आज एनआरएचएम कर्मचारी महासंघाने आंदोलनस्थळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेला राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बांबोळे, सचिव जितेंद्र कोटगले, कोषाध्यक्ष चंद्रकांत मेश्राम, उपाध्यक्ष डॉ.अनुपम महेशगौरी,धम्मदीप मेश्राम, किरण सूर्यवंशी, रचना फुलझेले, संगीता महालदार, रवीकिरण भडांगे,रवींद्र कोहळे, शीतल डोंगरे, बबलू अलोणे, डॉ.नंदू मेश्राम, नीलेश सुभेदार यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु झाल्यानंतर २००७ मध्ये पहिल्यांदा मूल्यमापन करण्यात आले. मागील ११ वर्षांपासून हे कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु यंदा अचानक नियमात बदल करण्यात आला. या कर्मचाऱ्यांचे काम चांगले नसते, तर त्यांना दरवर्षी नोकरीचा आदेश मिळाला नसता. मग, यंदाच पुनर्नियुक्तीच्या धोरणात बदल का करण्यात आला, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला.

एनआरएचएम कर्मचाऱ्यांमुळे बालमृत्युदर प्रचंड प्रमाणात कमी झाला. दवाखान्यात प्रसूती होण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांपर्यंत गेले. १९९८-९९ मध्ये बालमृत्युचे प्रमाण १०७८ होते. ते आता ३४७ पर्यंत कमी झाले. कुटुंबकल्याण, कायाकल्प व अन्य योजनांमध्ये गडचिरोली जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. एवढी मोठी उपलब्धी असताना एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा हक्क डावलला जात आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आरोग्यसेवेसंदर्भात महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, ७ क्रमांकावर असलेल्या पंजाब राज्याने व ८ क्रमांकावर असलेल्या मध्यप्रदेश सरकारने एनआरएचएम कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केले. मग, महाराष्ट्र सरकारला अडचण कोणती, असा सवाल करुन या कर्मचाऱ्यांनी सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप केला. सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षात असताना आमचे नेतृत्व करीत होते. त्यावेळी त्यांनी आमचे सरकार आल्यास कर्मचाऱ्यांना कायम करु, असे आश्वासन दिले होते. परंतु आता सत्तेत असताना ते आपले आश्वासन विसरले आहेत. आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांची भेट घेतली असता ते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश करतात आणि मुनगंटीवार यांची भेट घेतली असता ते डॉ.सावंत यांच्याकडे बोट दाखवतात, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १८ हजार जागा रिक्त आहेत. त्या जागांवर एनआरएचएम कर्मचाऱ्यांना कायम करावे, अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. शिवाय, माजी खासदार नाना पटोले, मारोतराव कोवासे व अन्य काँग्रेस नेत्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या. परंतु सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आमची विचारपूस करण्याचे सौजन्य दाखविले नाही, याबाबत आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RK6V7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना