/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२९: आरमोरी पंचायत समिती अंतर्गत करपडा येथील जिल्हा परिषद शाळेतील चार वर्गांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक असल्याने संतप्त गावकऱ्यांनी माजी सरपंच वैशाली डोंगरवार यांच्या नेतृत्वात आजपासून शाळा बंद करुन धरणे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात विद्यार्थीही सहभागी झाले आहेत.
करपडा येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत वर्ग असून, २२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, चारही वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. यंदाचे शैक्षणिक सत्र सुरु होऊन दोन महिने उलटले तरी इतर शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे आजपासून पालकांनी विद्यार्थ्यांसह शाळा बंद ठेवून धरणे आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकोडे, केंद्रप्रमुख राजेंद्र वडपल्लीवार, गटसाधन केंद्र समन्वयक कैलास टेंभुर्णे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. शिक्षण पोर्टलवर भरती सुरु झाल्यानंतर करपडा येथील शाळेत प्राधान्याने शिक्षकाची नेमणूक केली जाईल, तोपर्यंत सुशिक्षित युवकाची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करु, असे आश्वासन दिले. मात्र, स्थायी स्वरुपात शिक्षकाची नेमणूक होईपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.
करपडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैशाली डोंगरवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ डोंगरवार, सुनील ताडाम,रामदास डोंगरवार, लहुजी वाकडे, रंजू तुमरेटी,प्रीती रणदिवे, उर्मिला डोंगरवार उज्वला ताडाम, महादेव चुधरी, लोमेश वाकडे, देवराव चूधरी, शंकर चुधरी, रवी डोंगरवार,प्रवीण धारणे, राकेश मडावी,सोमेश्वर चुधरी,नामदेव ठाकूर,आकाश रणदिवे,चरण ठाकूर यांच्यासह विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.