/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.६: विविध जातींमधील आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल तर जातनिहाय जनगणना हाच त्यावरील उपाय असून, संसदेच्या विशेष अधिवेशनात ५० टक्कयांच्या मर्यादेपलीकडे जाऊन मराठ्यांना आरक्षण देण्याविषयी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंवाद यात्रेत सहभागी होण्यासाठी नाना पटोले आज गडचिरोलीत आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्कालिन राज्य सरकारने गायकवाड आयोग स्थापन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तो अमान्य करुन केंद्र सरकारकडे बोट दाखविले. परंतु केंद्र सरकार मराठा आरक्षणाविषयी काहीही बोलायला तयार नाही. २०१४ मध्ये भाजप नेत्यांनी मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आमिष दाखविले होते. आता दोन्ही समाजांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका पटोले यांनी केली. जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन मराठा समाजाचं आंदोलन सुरु झालं, गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन आंदोलकांवर लाठीमार झाला. मात्र, हा लाठीमार तीव्र स्वरुपाचा असल्याने हा डाव त्यांच्यावरच उलटला, असा घणाघात पटोले यांनी केला.
मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देताना ओबीसींचं आरक्षण कमी होता कामा नये, असेही पटोले म्हणाले. जातनिहाय जनगणना आणि आरक्षण देण्याबाबत राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीच्या वेळीच सकारात्मक भूमिका मांडली असल्याचे पटोले यांनी सांगितले. इंडिया आणि भारत एकच आहे. मात्र, इंडियाला सत्ताधारी एवढे का घाबरतात, असा सवाल नाना पटोले यांनी केला.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, निरीक्षक नाना गावंडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर उपस्थित होते.
जनसंवाद यात्रेत पटोले सहभागी
आज गडचिरोली तालुक्यातील येवली येथून काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. येवली, डोंगरगाव, शिवणी इत्यादी गावांतून मार्गक्रमण करीत ही यात्रा गडचिरोलीत पोहचली. नाना पटोले हे यात्रेत सहभागी झाले होते. संध्याकाळी गडचिरोली येथे नाना पटोले यांनी जाहीर सभेला संबोधित केले.
……………………………..