/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.६: चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारु वाहतूक करणाऱ्या पाच जणांवर गडचिरोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात गडचिरोली पोलिस ठाण्यातून निवृत्त झालेल्या एका पोलिस निरीक्षकाच्या दोन तरुण मुलांचाही समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी टाटासुमोसह सव्वा आठ लाखांची दारु जप्त केली आहे.
आकाश भरडकर, निखिल दामदेव मंडलवार, नीरज दामदेव मंडलवार अशी आरोपींची नावे असून, अन्य दोन अज्ञात युवकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दामदेव मंडलवार हे अडीच वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक होते. सेवानिवृत्तीनंतर ते राजकारणात सक्रिय असून, सध्या काँग्रेस पक्षाच्या रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत.व्याहाळ येथे ते बार चालवितात.
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतानाही चंद्रपूर जिल्ह्यातून अवैधरित्या येथे दारु पुरवठा केला जातो. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना दारु पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने आज पहाटे आकाश भरडकर हा दामदेव मंडलवार व त्यांची मुले नीरज मंडलवार आणि निखिल मंडलवार हे चालवीत असलेल्या राज बारमधून टाटा सुमो वाहनाने गडचिरोलीच्या दिशेने दारु आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड, अंमलदार प्रशांत गरफडे, श्रीकृष्ण परचाके, श्रीकांत बोइना, हवालदार मनोहर तोगरवार हे मूल मार्गावर पाळत ठेवून होते.
एवढ्यात एक वाहन येताना दिसले. पोलिस दिसताच सेमाना बायपासमार्गे पोटेगाव व चातगावकडे वाहन वेगाने पळून गेले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन बोदली गावाजवळ वाहन अडविले. अंधाराचा फायदा घेत वाहनातील दोन जण पळून गेले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात ३ लाख २४ हजार रुपयांची विदेशी दारु आणि बियर आढळून आली. पोलिसांनी वाहन आणि दारु असा एकूण ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात आकाश भरडकर, निखिल मंडलवार, नीरज मंडलवार तसेच अन्य दोन अज्ञात इसमांवर कलम ६५(अ), ८३, ९८(२) महाराष्ट्र दारुबंदी कायदा सहकलम ३५३ व ३३२ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड प्रकरणाचा तपास करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.