/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदी वर्णी लागली आहे. धर्मरावबाबा आत्राम यांना तब्बल १५ वर्षांनंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
धर्मरावबाबा आत्राम हे यापूर्वी तिनदा मंत्री होते. आज त्यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. १९७५ मध्ये ते सर्वप्रथम अहेरी ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. पुढे १९८० मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर ते १९८२ पर्यंत सभापती राहिले. गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. १९८५ ते १९८८ या कालावधीत त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. पुढे १९९० मध्ये तत्कालिन सिरोंचा विधानसभा क्षेत्रातून धर्मरावबाबा हे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. त्याच सुमारास २७ एप्रिल १९९१ रोजी आलापल्ली-भामरागड मार्गावरील मेडपल्ली येथे एका लग्न समारंभासाठी गेले असता नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. जहाल नक्षलवादी विकास उर्फ शिवण्णाच्या सुटकेनंतर नक्षल्यांनी तब्बल २० दिवसांनंतर धर्मरावबाबांची सुटका केली होती.
त्यानंतर जून १९९१ मध्ये त्यांचा आदिवासी विकास व वनराज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. १९९९ मध्ये धर्मरावबाबांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. १६ जुलै २००२ रोजी त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले पुढे २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयश्री मिळवली आणि सामाजिक न्याय,खनिकर्म व परिवहन राज्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. मात्र, चिंकारा शिकार प्रकरणात २००८ मध्ये त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढे २००९ ते २०१९ अशी दहा वर्षे धर्मरावबाबांना पराभवामुळे विधानसभेबाहेर राहावे लागले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी ताकदीने विजय संपादन केला.
ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून आज धर्मरावबाबांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तब्बल १५ वर्षांनंतर त्यांना मंत्रिपद मिळाल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. धर्मरावबाबा आत्राम यांना महत्वाचे खाते आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.