शुक्रवार, 3 मे 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना             ठाणेगाव येथून १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, तिघे जण ताब्यात: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई             छत्तीसगडमधील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत चार नक्षल कमांडर ठार           

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र:सरकारविरोधी वातावरणातही ‘फिफ्टी-फिफ्टी’ची शक्यता?

Sunday, 21st April 2024 06:18:09 AM

जयन्त निमगडे/गडचिरोली,ता.२१: गडचिरोली-चिमूर क्षेत्राची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक संपल्यानंतर आता कार्यकर्ते बेरीज आणि वजाबाकी करण्यात व्यस्त झाले आहेत. यावेळी सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणावर सत्ताविरोधी वातावरण दिसून आले. त्यामुळे विजयाचे गणित सांगताना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसतो, तर काँग्रेस कार्यकर्त्यांची छाती अतिआत्मविश्वासाने भरुन आल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत ‘फिफटी-फिफ्टी’ची शक्यता असल्याचे तटस्थ व्यक्तींचे मत आहे.

अशोक नेतेंना कार्यकर्त्यांचाच विरोध

महाराष्ट्रात सर्वाधिक चारशे किलोमीटर लांबीच्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबतच भाजपमधील अंतर्गत मतभेदाची दरीदेखील खूप खोल गेल्याचे निवडणुकीदरम्यान जाणवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचंड विरोध असतानाही भाजप श्रेष्ठींनी अशोक नेते यांना उमेदवारी दिली. अशोक नेते हे दहा वर्षे आमदार आणि दहा वर्षे खासदार होते. या २० वर्षांत भाजप कार्यकर्ते नेतेंच्या विरोधात कधी बोलताना दिसले नाही. केवळ भाजप आणि कमळ चिन्ह एवढेच त्यांच्यासाठी पुरेसे राहिले. परंतु यंदा प्रथमच ते अशोक नेतेंच्या विरोधात बोलताना दिसले. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हवे आहेत, मात्र, खासदार म्हणून अशोक नेते अजिबात नको, एवढे कठोर मतप्रदर्शन भाजप कार्यकर्ते उघडपणे चौकाचौकात करताना दिसले, ही टोकाची भूमिका बहुतांश सर्वच विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची होती, हेही येथे उल्लेखनीय. नेमकी येथेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद दिसून आली. मतपेटीत ती प्रदर्शितही होईल. उद्या अशोक नेते पराभूत होतील किंवा निवडूनही येतील; मात्र, आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय तुम्ही राजकारण करु शकत नाही, असा अप्रत्यक्ष इशारा यातून दिला गेला, एवढे नक्की.

धर्मरावबाबाच होते स्टार प्रचारक

अहेरीपासून आमगावपर्यंत आणि गडचिरोलीपासून चिमूरपर्यंत कार्यकर्त्यांचा विरोध असल्याने अनेक प्रमुख नेतेही प्रचारात फार जीव ओतताना दिसले नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम हेच स्टार प्रचारक असल्याचे दिसून आले. धर्मरावबाबांनी स्वत:ला प्रचारात झोकून दिल्याने थोडी परिस्थिती सुधारली. अहेरी माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्रामांनी त्यांना साथ दिल्याने आणखी फरक पडला. मात्र, कोडवते फॅक्टरला दिलेले महत्व फार उपयोगी पडले नाही. माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी हेही फिरले. परंतु आदिवासींनी उसेंडींना फार पसंती दिली नाही. उसेंडी स्वत: उभे राहणे आणि इतरांसाठी मत मागणे, यात खूप फरक आहे, हेही यानिमित्त दिसून आले. चिमूरमध्ये आ.बंटी भांगडिया, आरमोरीत अरविंद सावकार आणि प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आ.कृष्णा गजबे, तर गडचिरोलीत आ.डॉ.देवराव होळी यांनी बरेच परिश्रम घेतले. ही सर्व मंडळी कामाला लागली. परंतु भाजप कार्यकर्ते केवळ मोदी सरकारच्या योजनांवरच भर देऊन मत मागताना दिसले. ते मतदारांना रुचले असेल, तर अशोक नेते विजयी होतील, अन्यथा नाही.  

मोदीविरोधी लाटेचा प्रभाव

एकीकडे, भाजपमध्ये अशोक नेते यांना अंतर्गत विरोध असताना सामान्य मतदारांमध्ये मोदीविरोधी लाट असल्याचेही जाणवले. केवळ भाजपविरोधी नेत्यांवरच ईडी, सीबीआयच्या धाडी कशा पडतात, महागाई कमी कशी नाही झाली, रोजगारनिर्मिती किती झाली असे प्रश्न विचारताना सामान्य मतदार दिसला. या प्रश्नांबरोबरच संविधान बदलण्याचा मुद्दा प्रामुख्याने दलित मतदारांच्या जिव्हारी लागला. (या मुद्द्यावर ओबीसी समाजातूनही अलीकडे प्रतिक्रिया यायला लागल्या होत्या). त्यामुळे ‘यंदा वंचित बिंचीत काही नाही, सिधा काँग्रेस’ या निर्णयाप्रत दलित मतदार आल्याचे दिसून आले. पण, हा भाजपविरोधी मतदार काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांचा खूप चाहता होता, असाही त्याचा अर्थ नाही. देशात मजबूत तिसरी आघाडी नाही म्हणून काँग्रेसला मत एवढाच त्याचा अर्थ काढता येईल. डॉ. किरसान पाच वर्षांत पायाला भिंगरी बांधून फिरले. नाटकं, दंडारी आणि नवसालाही ते गेले. त्यामुळे किरसान यांचे नाव आणि चेहरा लोकांच्या लक्षात राहिला. त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. शिवाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रचारात मोठी ताकद लावली होती. विजयासाठी कुणाला मॅनेज करावे लागते, याचे सूत्र वडेट्टीवारांना ठाऊक आहे. काँग्रेसची मोठी फौजदेखील कामाला लागली होती. या बाबीही किरसान यांना फायद्याच्या ठरु शकतात. ग्रामीण भागात यंदा काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. हा प्रतिसाद मतपेटीत परावर्तीत होतो का, ते बघणे औत्सुक्याचे ठरेल.

किरसान यांची नकारात्मक बाजू

यापलीकडचा विचार केल्यास डॉ.नामदेव किरसान यांच्या काही बाजू नकारात्मकदेखील आहेत. किरसान हे अनेक वर्षे मोठे अधिकारी होते. त्यामुळे अधिकारीपदाचा अविर्भाव आणि अवास्तव शिस्त त्यांच्या व्यक्तीमत्वात दिसून येते. कुणी कार्यकर्ता, पत्रकार वा प्रतिष्ठीत नागरिक भेटला तर किंचीत स्माईल करण्यापलीकडे किरसान हे काहीही करत नव्हते. कधी त्यांनी कोणाची विचारपूस केली नाही किंवा मदत करा, असेही म्हटल्याचे दिसले नाही. त्यामुळे ते लोकांना भावले नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते कोण, त्यांच्या उमेदवारांनी यापूर्वी घेतलेली मते किती, आता त्यांची किती मदत होऊ शकते, त्यांना आपण सन्मान द्यायला हवा का, असे प्रश्न किरसान यांना पडले असतील, असे मला वाटत नाही. काँग्रेसच्या गडचिरोलीतील काही प्रमुख नेत्यांमधील गुर्मीही यावेळी दिसून आली. त्यामुळे बरेच जण मंडपात जाणेही पसंत करीत नव्हते.

अशाही परिस्थितीत किरसान यांना जी मते मिळतील; ती केवळ भाजपविरोधी असतील, असाच त्याचा अर्थ काढता येईल. एकूणच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात दहा उमेदवार रिंगणात होते; तरीही ही निवडणूक केवळ भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांभोवतीच फिरत आहे. मतदारांनी दिलेला कलही तसाच असेल आणि तो ४ जूनलाच कळेल.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
J1HEU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना