शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दोन जहाल नक्षल्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Thursday, 7th December 2017 07:38:38 AM

गडचिरोली, ता.७: नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहादरम्यान ७ जहाल नक्षल्यांना ठार झाल्याची बातमी ताजी असतानाच आज दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. कमला रामसू गावडे व नागेश उर्फ राजेश मतूरसाय मडावी अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला गावडे ही कोरची दलममध्ये कार्यरत होती. २०११ मध्ये ती केकडी दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली. फुलगोंदी येथील चकमक व टाहकाटोला येथील एका इसमाच्या हत्येत सहभाग होता. शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

नागेश उर्फ राजेश मतूरसाय मडावी हा २०११ मध्ये छत्तीसगडमधील पल्लेमाडी दलममध्ये भरती झाला. पल्लेमाडी जंगलातील चकमक, छत्तीसगडमधील येरकड-नांदगाव रस्त्यावरील चकमक, सितगाव-मुंजाल रस्त्यावरील भूसुरुंगस्फोट, तोळके गावातील कोरेटी नामक इसमाची हत्या, जक्के येथील ग्रामपंचायतीमध्ये काळा झेंडा फडकावणे इत्यादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. आज या दोघांनीही नक्षलविरोधी अभियानाचे अपर पोलिस महासंचालक डी.कनकरत्नम, विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. चालू वर्षांत आतापर्यंत एक कंपनी सदस्य, एक एरिया कमिटी सदस्य यांच्यासह विविध दलमच्या १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित नक्षल्यांपासून प्रेरणा घेऊन दलममधील इतर सदस्यही नक्कीच आत्मसमर्पण करतील, असा विश्वास पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे. काल(ता.६) सात नक्षल्यांना ठार केल्यानंतर आज दोन नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HU0AK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना