शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

चकमकीत १६नक्षली ठार, डीव्हीसी, कमांडर्सचा समावेश?

Sunday, 22nd April 2018 08:43:57 AM

गडचिरोली, ता.२२: आज सकाळी भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागात बोरिया जंगलात पोलिसांशी झालेल्या तुंबळ चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला असून, त्यात काही डीव्हीसी व कमांडर्सचाही समावेश असल्याचेही सांगितले आहे..

पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे व पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितले की, काल रात्री भामरागड व एटापल्ली तालुक्यातील कसनासूर-बोरिया जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची माहिती मिळाल्याने सी-६० पथकाचे जवान त्या भागात दाखल झाले होते. दरम्यान आज सकाळी १०  वाजताच्या सुमारास सी-६० पथकाचे जवान, सीआरपीएफच्या ९ क्रमांकाच्या बटालियनचे जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. ही चकमक ११ वाजतापर्यंत सुरुच होती. या चकमकीत १६ नक्षली ठार झाले असून, पोलिसांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या चकमकीत अख्खे दलमच ठार झाले असून, मृतांचा आकडा २५ पर्यंत असू शकतो, असा अंदाज शरद शेलार यांनी व्यक्त केला. मात्र, घटनास्थळ परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्याचे मृतदेह आणण्यास व अन्य बाबीस उशीर होत असल्याचे शेलार म्हणाले. या चकमकीत पेरमिली दलम कमांडर व डीव्हीसी साईनाथ तसेच अन्य डीव्हीसी, कमांडर व उच्चपदस्थ नक्षली या चकमकीत ठार झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.. 

नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य तथा पेरमिली दलम कमांडर साईनाथ, कंपनी कमांडर सिनू व अन्य काही कमांडर या दलमसोबत होते. तेही या चकमकीत ठार झाल्याचा दावा पोलिस महानिरीक्षकांनी केला. सिनू उर्फ श्रीकांत उर्फ बिजेंदर नरसिम्हारामलू राऊथू(५१) हा तेलंगणा राज्यातील छल्लगारी येथील रहिवासी असून, त्याने २००३ मध्ये सिरोंचा एलओएसचा सदस्य म्हणून नक्षल चळवळीत आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. पुढे त्याची एसीएम व डीसीएम म्हणून पदोन्नती झाली.  त्यानंतर २००७ मध्ये सिनूचा प्रेमविवाह दीपा उर्फ आमसूबाई उर्फ गोदावरी रा.आमदाबाद हिच्याशी झाला. दीपा ही जिमलगट्टा एलओएसमध्ये कार्यरत होती. मात्र, काही दिवसांतच दीपा ही दुसऱ्या दलम सदस्यासह पळून गेली आणि नंतर दोघांनीही आंध्रप्रदेश पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर सिनूने शामला नामक दुसऱ्या दलम सदस्य महिलेशी लग्न केले. २००९ मध्ये तीने नक्षल्यांचे ३० ते ३५ लाख रुपये घेऊन पळ काढला आणि आंध्रप्रदेश पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पत्नीने पार्टी फंड घेऊन पळ काढल्याने नक्षल्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी सिनूवर संशय घेऊन त्याला कंपनी क्रमांक १० मध्ये पाठविले. त्यानंतर २०१७ मध्ये सिनूची नियुक्ती दक्षिण गडचिरोलीचा विभागीय सचिव म्हणून करण्यात आली. त्याच्या विरोधात खून, जाळपोळ, अपहरण, मारहाण असे ८२ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. 

ठार झालेल्या दुसऱ्या मोठ्या नक्षल्याचे नाव साईनाथ उर्फ डोलेश मादी आत्राम(३६) असे असून, तो अहेरी तालुक्यातील गट्टेपल्ली येथील मूळ रहिवासी होता. पेरमिली दलम कमांडर व विभागीय समिती सदस्य पदावर तो कार्यरत होता. २००४ मध्ये पेरमिली दलम सदस्य म्हणून तो भरती झाला. २००८ मध्ये त्याची अहेरी एलओएसमध्ये बदली झाली. याचवेळी त्याने अॅक्शन टीम सदस्य म्हणूनही काम केले. २०१२ मध्ये पेरमिली दलम कमांडर, २०१४ मध्ये एसीएस, २०१५ मध्ये डीसीएम म्हणून त्याला पदोन्नती मिळाली. त्यापूर्वी साईनाथने पेरमिली एरियात मिलिशिया स्क्वॉड व अॅक्शन टीममध्ये काम केले. साईनाथची पत्नी कैका उर्फ सरिात कोलू कोवाची ही झारेवाडाची रहिवासी होती. ती पेरमिली दलम उपकमांडर होती. परंतु १९ एप्रिल २०१६ रोजी ताडगाव परिसरातील बांडेनगर जंगलात झालेल्या चकमकीत ती ठार झाली होती. तिच्या मृत्युनंतर आज बरोबर दोन वर्षांनी साईनाथला प्राण गमवावा लागला. याच दिवशी साईनाथच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. पत्नीच्या मृत्युमुळे तो हतबल झाला होता. त्याच्याविरुद्ध खून, स्फोट, अपहरण, जाळपोळ, मारपीट इत्यादी ७५ गुन्हे दाखल होते. सिनू व साईनाथ यांच्यावर प्रत्येकी १६ लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी ओरिसामध्ये २ डीव्हीसी ठार झाले होते. त्यानंतरची ही सर्वांत मोठी चकमक असल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले.

पोलिसांनी १६ नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जिल्ह्यात नक्षल चळवळीचा शिरकाव झाल्यापासूनच्या ३८ वर्षांतील पोलिसांनी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.२०१३ मध्ये अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथे पोलिसांनी ६ नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. त्यानंतर ६ डिसेंबर २०१७ रोजी सिरोंचा तालुक्यातील कल्लेड येथील जंगलात पोलिसांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला होता. या दोन घटनांनंतरची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. वासुदेव मडावी व मधुकर नैताम यांच्या नेतृत्वातील सी-६० पथकाने ही कारवाई केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Z0850
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना