/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.९ : वाढती बेरोजगारी, आर्थिक विकासाचा श्रीमंतांना होणारा जास्तीचा लाभ, अर्थव्यवस्थेसोबत न झालेला लोकशाहीचा विकास, अस्मितेचे संकट, नैसर्गिक संसाधनाचा बेसुमार वापर या कारणांमुळे भारताचा आर्थिक विकास दर वाढत असला; तरी विकास मात्र भरकटत आहे, असे प्रतिपादन हार्वर्ड केनेडी स्कूलचे प्रा.डॉ.ए.के.शिवकुमार यांनी केले.
भारतीय अर्थव्यवस्थेचे नेमके वास्तव युवा वर्गाला कळावे यासाठी 'सर्च' येथे आयोजित 'निर्माण' कार्यशाळेत प्रा. डॉ. ए. के. शिवकुमार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 'इंडियाज ग्रोथ स्टोरी' या विषयांतर्गत वेगवेगळ्या तीन सत्रात डॉ. शिवकुमार यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा दोन दशकांचा पट उलगडत भारतीय अर्थव्यवस्थेचे वास्तव मांडले.
डॉ. शिवकुमार हे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ असून हार्वर्ड विद्यापीठ, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस आणि यंग इंडिया फेलोशिप (अशोका युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली) येथे अर्थशास्त्र आणि पब्लिक पॉलिसी हा विषय शिकवतात. सध्या ते संयुक्त राष्ट्र आणि केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने गठित केलेल्या इंटरनॅशनल सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंटचे संचालक आहेत. प्रा. शिवकुमार हार्वर्ड विद्यापीठात त्यांची पीएचडी पूर्ण करत असताना जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे विद्यार्थी होते.
डॉ. शिवकुमार यांनी 'इंडियाज ग्रोथ स्टोरी' या पहिल्या सत्रात भारताचा आर्थिक विकासदर, आर्थिक लोकसंख्याशास्त्र निर्देशांकात असलेले भारताचे स्थान, गेल्या दोन दशकात कमी होत गेलेली गरिबी या बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
जागतिक बँकेच्या २०१२ च्या अहवालानुसार, भारतात २७ कोटी लोक हे गरीब असून पाच व्यक्तीमागे एक जण गरीब आहे. ८० टक्के गरीब ग्रामीण भागात राहतात. लोकांच्या हाती पैसा येऊन ते गरिबीरेषेच्या वर येत असले; तरी श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील दरी झपाट्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक भूक निर्देशांकात भारत १०० व्या स्थानावर आहे. ३१.४ टक्के लोकांना खायला पुरेसे अन्न मिळत नाही. वाढती बेरोजगारी, आर्थिक विकासाचा श्रीमंतांना होणारा जास्तीचा लाभ, अर्थव्यवस्थेसोबत न झालेला लोकशाहीचा विकास, अस्मितेचे संकट, नैसर्गिक संसाधनाचा बेसुमार वापर या कारणांमुळे भारताचा आर्थिक विकास दर वाढत असला; तरी विकास भरकटत असल्याचे त्यांनी सांगितले.