/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
कुरखेडा,ता.७: आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्य शासनाने पुराडा येथील आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केन्द्राचा दर्जा प्रदान केला आहे. यासंदर्भात शासनाने ३ सप्टेंबर २०२० रोजी निर्णय जारी केला आहे.
पुराडा आरोग्य पथकाचा समावेश देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत होता. या आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र ४० ते ४५ किलोमीटरपर्यंत होते. शिवाय त्यात ५० हजारांहून अधिक लोकसंख्या समाविष्ट असल्याने आरोग्यविषयक विविध अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे विभाजन करुन या केंद्रात असलेल्या पुराडा आरोग्य पथकास प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व पुराडा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत होती.
यासंदर्भात आमदार कृष्णा गजबे यांना स्थानिक लोकप्रतिनिधी व आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते. पुढे २०१५ पासून आमदार कृष्णा गजबे यांनी पुराडा येथील आरोग्य पथकाचे रुपांतर प्राथमिक आरोग्य पथकात व्हावे, यासाठी सभागृहात प्रश्न उपस्थित करुन, सातत्याने पाठपुरावा केला. ८ मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी मागणी लावून धरली होती. त्याअनुषंगाने २०जुलैला पुराडा आरोग्य पथकास प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा देण्यास अंतिम मान्यता प्रदान करण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भ्रमनध्वणीवरुन आ.कृष्णा गजबे यांना सांगितले. त्यानंतर ३ सप्टेंबरला राज्य शासनाने पुराडा आरोग्य केंद्र मंजुरीचा निर्णय काढला.
या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा निर्माण होणार असून, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावल्याबद्दल भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य नाजुक पुराम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, पुराड्याचे माजी उपसरपंच हरिश्चंद्र डोंगरवार,खेमनाथ डोंगरवार, मंडळ संपर्कप्रमुख विलास गांवडे, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, गीता कुमरे,अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक नागेश फाये, ऍड उमेश वालदे, तसेच पुराडा परिसरातील नागरिकांनी आमदार कृष्णा गजबे यांचे अभिनंदन केले आहे.