/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१०: कुक्कुटपालन योजनेचा लाभ देण्याकरिता लाभार्थीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज चामोर्शी पंचायत समितीचा पशुधन विकास अधिकारी (वर्ग-१) सागर डुकरे(३२) यास रंगेहाथ पकडले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारकर्त्याने कुक्कुटपालन योजनेंतर्गत १ हजार मांसल पक्षी मिळण्याकरिता चामोर्शी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज केला होता. परंतु पशुधन विकास अधिकारी सागर डुकरे याने त्यास १० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून सागर डुकरे यास त्याच्याच कक्षात तक्रारकर्त्याकडून १० हजारांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, श्रीधर भोसले यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार प्रमोद ढोरे, हवालदार नथ्थू धोटे, पोलिस नाईक राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, संदीप घोरमोडे, ज्योत्स्ना वसाके, स्वप्नील वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.
चामोर्शी पंचायत समितीतील महिनाभरातील दुसरी कारवाई
चामोर्शी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यावर एसीबीने महिनाभरात केलेली ही दुसरी कारवाई आहे. २२ एप्रिलला याच पंचायत समितीची कनिष्ठ सहायक(वर्ग-३) वनिता प्रभाकर तावाडे(५३) हिला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते.